कोल्हापूर : कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे समर्थक भारत बाबासाहेब पाटील भुयेकर रा. भुये ता. करवीर यांची तर उपसभापतीपदी जनसुराज्यचे शंकर बाबासाो पाटील, बारगीर रा. शिवारे ता. शाहूवाडी यांची गुरूवारी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा दुग्ध उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी निवडणून निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
बाजार समितीच्या सभागृहामध्ये झालेल्या या निवडीमध्ये संचालक प्रकाश देसाई यांनी भुयेकर पाटील यांचे नाव सुचवले तर शिवाजीराव पाटील यांनी अनुमोदन दिले. उपसभापतीपदी शंकर पाटील यांचे नाव सुर्यकातं पाटील यांनी सुचवले तर शेखर देसाई यांनी अनुमोदन दिले.
तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहावर जिल्हा बॅंकेचे संचालक ए. वाय. पाटील, युवराज पाटील, भैय्या माने, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, शशिकांत खोत यांची बैठक झाली. बुधवारीच नेत्यांनी या नावांवर शिक्कामोर्तब केले होते. संबंधित दोघांनाही अर्ज दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी मालगावे यांनी ११ वाजून ९ मिनिटांनी निवड प्रक्रिया सुरू केली. दहाच मिनिटांमध्ये या निवडी होवून सत्कार समारंभ सुरू झाला. यावेळी ए. वाय. पाटील हे प्रक्रिया संपेपर्यंत थांबून होते. यावेळी पाटील यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून फटाके फोडले. नुतन सभापतींची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.