कोल्हापूर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव मोटारकार तीन दुचाकींना धडकून उलटली. ही घटना कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावर घाटात वॉटरपार्कशेजारी धोकादायक वळणार घडली. दुर्घटनेत तिघे दुचाकीस्वार जखमी झाले. आदित्य अमर चौगुले (वय १९ रा.राजेंद्रनगर), बालाजी शिवाजी पवार व मनोज पांडुरंग सावंत (दोघेही रा.कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निष प्रकाश कदम (वय ३६ रा.मिरज, जि.सांगली) हे आपल्या मोटारीतून पन्हाळ्याहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने येत होते. पन्हाळा घाटात वॉटर पार्कनजीक आले असता, धोकादायक वळणार त्यांचा मोटारीवरील ताबा सुटला व मोटार थेट कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे निघालेल्या दुचाकीस्वारास जोरात धडकून उलटली. त्यानंतर, ही मोटार रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोपेडस्वार दोघांना व बुलेटस्वारावरही जाऊन आदळली. शनिवारी दुपारी झालेल्या अपघातामुळे परिसरात काही वेळ गोंधळ उडाला. अपघातात दुचाकीस्वार आदित्य चौगुले तर मोपेडवरील बालाजी पवार, मनोज सावंत हेही जखमी झाले. बुलेटस्वार बाजूला थांबल्याने तो या दुर्घटनेतून बचावला.
जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाले, तर हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारकार चालक निष कदम याच्यावर शनिवारी रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्याने सहा.फौजदार निवास पवार हे तपास करत आहेत.