कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मंडल तुरुंग अधिकारी उत्तरेश्वर गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आज, रविवारी रात्री उशिरा सुनील गजानन शिंदे (वय २४, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) व लक्ष्मण तुकाराम सोनवणे (वय ३२, रा. बिजली चौक, जवाहरनगर, कोल्हापूर) या दोघांना अटक केली. यापूर्वी अमित महादेव भास्कर (वय २६, रा. जवाहरनगर) यास अटक केली असून, आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तीन झाली आहे. राजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित सराईत गुंड पिंटू ऊर्फ अमित भास्कर याला आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याचे आणखी तिघे साथीदार संशयित लक्ष्मण सोनवणे, नरेश सोनवणे व सुनील शिंदे हे पसार झाले होते. त्यापैकी सुनील शिंदे व लक्ष्मण सोनवणे यांना अटक झाली. तुरुंग अधिकारी गायकवाड हे कैद्यांना शिस्त लावतात. कारागृहात कैद्यांच्यात दहशत माजविण्याच्या प्रकाराने गुंड भास्कर याच्याशी गायकवाड यांचा वाद झाला होता. हा राग मनात धरून त्याने पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर पाळत ठेवून हल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गायकवाड हे फिरण्यासाठी संभाजीनगर-आयसोलेशन हॉस्पिटल रोड येथे गेले असता पाठीमागून तिघा अज्ञातांनी त्यांच्यावर स्टम्प व लाकडी काठीने मारहाण करून त्यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. गायकवाड हे नुकतेच रूजू झाले आहेत. त्यामुळे हल्ला कोण करू शकतो, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलीस उपनिरीक्षक भानुदास जाधव यांनी कारागृहातून किती कैदी पॅरोलवर (रजा) सुटले आहेत, याची माहिती घेतली. भास्कर बाप-लेकांसह चुलतभाऊ अमोल भास्कर यांना राहुल चव्हाण याच्या खूनप्रकरणी सात वर्षे जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यामध्ये पंधरा दिवसांपूर्वी पिंटू भास्कर व त्याचा वडील सुटल्याची माहिती मिळाली. तुरुंग अधिकारी गायकवाड हे कैद्यांना शिस्त लावतात. त्यांची शिस्त कैद्यांना मान्य नव्हती. या कारणातून पिंटू भास्कर व गायकवाड यांच्यामध्ये वादावादी झाली होती. हा धागा पकडत त्यांनी दोन दिवसांपूर्वी पिंटूला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली. सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली.
भास्करच्या दोघा साथीदारांना अटक
By admin | Published: September 15, 2014 12:32 AM