प्रदीप शिंदेकोल्हापूर : तेजोमय प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी होय. त्यामधील बहीण-भावाचे नाते जपणारी ‘भाऊबीज’ही नुकतीच साजरी झाली. कोल्हापूर आगारात वाहक असलेल्या आपल्या भावाचे औक्षण बहिणीने चक्क एस.टी. बसमध्ये केले. प्रवाशांच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या अनोख्या भाऊबीजेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.प्रवाशांच्या आनंदासाठी दिवाळी सणापासून एस.टी.चे अधिकारी, चालक, वाहक व अन्य कर्मचारी नेहमीच वंचित राहतात. सध्या एस.टी. स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आहे. जादा काम लागत असले तरी सणाच्या कालावधीत प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचण्याच्या अनोखा आनंद चालक व वाहकांना वाटत असतो.पेठवडगाव येथील संजय आनंदा कुंभार हे कोल्हापूर आगारात वाहक आहेत. दिवाळीनिमित्त वैशाली राजेंद्र कुंभार ही त्यांची धाकटी बहीण भोर, जि. सातारा येथून माहेरी येते. काही कारणास्तव यंदा तिला दिवाळीला येता आले नाही. दोन दिवसांपासून भाऊ संजय यांना भाऊबीजेनिमित्त सासरी येण्यासाठी वैशाली या फोन करीत होत्या. मात्र नोकरीमुळे भाऊबीजेला येता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
भाऊबीजेदिवशी संजय यांना पुणे मार्गावरील ड्यूटी लागली. दुुपारी चारपर्यंत भावाची वाट पाहून वैशाली यांनी संजय यांना फोन करून ‘भाऊ, तू आज येतोस ना?’ असे विचारले. संजय यांनी ‘मी पुण्याला जात आहे; त्यामुळे येता येणार नाही,’ असे सांगितले. तेव्हा बहिणीने ‘भोर फाट्याजवळ येताना फोन कर,’ असे सांगितले.रात्री साडेनऊला संजय यांनीही भोर फाट्याजवळ येताच बहिणीला फोन केला. गाडी भोर फाटा येथे थांबताच, बहीण वैशाली या भावाच्या औक्षणासाठी ओवाळणीचे ताट घेऊन चक्क गाडीमध्ये आल्या. संजय यांच्यासह गाडीतील अन्य प्रवाशांना काहीच कळले नाही. वैशाली यांनी भाऊ संजय यांचे औक्षण केले.
चालक बुरहान मोमीन यांचेही त्यांनी औक्षण केले. काही क्षणांतच गाडी पुण्याकडे निघाली. ही अनोखी भाऊबीज पाहून अन्य प्रवाशांच्याही डोळ्यांत पाणी आले. काही प्रवाशांनी या प्रसंगाचा फोटो तत्काळ सोशल मीडियावर टाकला. या अनोख्या भाऊबीजेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
बहीण फराळाचा डबा घेऊन येईल, असेच वाटत होते. मात्र तिने गाडीत येऊन चक्क औक्षण केले. ही भाऊबीज माझ्यासाठी खूप अविस्मरणीय राहील.- संजय कुंभार, वाहक