कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे उद्या, रविवारपासून बुधवारपर्यंत भीम महोत्सव व व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, असे समितीचे मार्गदर्शक प्रा. शहाजी कांबळे व अध्यक्ष डॉ. शरद गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत शोभायात्रा, जाहीर व्याख्यान हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अभिवादनदेखील ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. उद्या, रविवारी सायंकाळी सहा वाजता ‘महात्मा फुले यांची कामगार चळवळ आणि आजचे वास्तव’ या विषयावर डॉ. प्रमोद फरांदे, सोमवारी (दि. १२) ‘फुले आंबेडकरी विचारधारा आणि रंगभूमी’ या विषयावर डॉ. अरुण मिरजकर, मंगळवारी (दि. १३) ‘डॉ. आंबेडकर यांची जलनीती’ विषयावर डॉ. खंडेराव काळे यांचे ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. बुधवारी (दि. १४) जयंतीदिनी बिंदू चौकात आंबेडकर व फुले यांच्या पुतळ्यांना मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन होणार आहे. याच दिवशी सायंकाळी पाच वाजता ‘फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे’ या विषयावर समिती अध्यक्ष डॉ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान होणार आहे. सहा वाजता शामसुंदर मिरजकर यांचे व्याख्यान होणार आहे.