कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले. संतप्त युवकांनी कोल्हापूर शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला.
इचलकरंजी, कागल, हुपरी आणि पट्टणकोडोली या गावामध्ये काही युवकांनी चौकात टायरी जाळून रास्ता रोको करण्यात आले. दरम्यान, सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोल्हापूर शहरात बिंदू चौकात या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध संघटना दुपारनंतर एकत्र येणार आहेत.भीमा कोरेगाव येथे सोमवारी दोन गटात झालेल्या वादावरून दगडफेक झाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. कोल्हापूर शहरात काही युवकांनी सदर बाजार परिसरात रस्त्यावर येत रास्ता रोको केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जिल्ह्यातील इचलकरंजी, पट्टणकोडोली, हुपरी आणि कागल परिसरातही या घटनेचे पडसाद उमटले.इचलकरंजी परिसरातील शिरदवाड चौकात टायरी जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कबनुर येथे पोलिसांच्या गाडीला जमावाने अडवले होते. इचलकरंजी शहर आता बंद करा असे म्हणत काहीजण फिरत आहेत. मात्र, त्यांच्या आवाहनाला जास्त प्रमाणात पाठिंबा मिळालेला नाही.
मुख्य मार्गावरील फेरीवाल्यांनी आपली दुकाने गुंडाळली आहेत. काही मोठी दुकाने दुकानदारांनी बंद ठेवली आहेत. या परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी जमावाला प्रांत कार्यालयात आणून समजावून सांगितल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. इचलकरंजी परिसरातील वातावरणामुळे इथे निघणारी कामगार संघटनेची भव्य फेरी रद्द करण्यात आली आहे.दरम्यान, भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निवेदन पट्टणकोडोली येथील बौद्ध समाजाने हुपरी पोलिसांना दिले. वसगडे येथेही बंद पाळण्यात आला असून तेथे राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. रुकडी येथेही काही ठिकाणी दगडफेक झाल्याचे समजते. कागल येथेही काहीजण सकाळी एकत्र आले होते. पण जबाबदार नागरीकांनी समजावुन सांगितल्यामुळे हा परिसर शांत राहिला. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथेही शांततेत बंद पाळण्यात आला.दरम्यान, कागल तालुक्यातील सांगाव येथे एका व्यक्तीने सोशल मिडियावर चुकीचा डीपी ठेवल्याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी संबंधिताला समज दिली. मात्र दुसऱ्या एका युवकानेही याच डीपीची पुनरावृत्ती केल्याने त्याबाबत नोंद झाली आहे. गाव बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते, मात्र पोलिस अधिकारी औदुंबर पाटील यांच्या आवाहनानंतर बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.