करवीर तालुक्यातील अनेक गावे शहराच्या सभोवती आहेत. यामुळे शेजारच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. काही भागांत शहराच्या उपनगरांचा समावेश झाला आहे. यामुळे नोकरी, उद्योग व मजुरीसाठी आलेले अनेक नागरिक उपनगर व शेजारच्या गावांत वास्तव्याला आहेत. या लोकांना आर्थिक अडचणीत बँका, पतसंस्था कर्जाला दारात उभा करून घेत नाहीत.
आर्थिक अडचणीच्या वेळी हे मोलमजुरी करणारे लोक लागणाऱ्या पैशाची सोय व्हावी या हेतूने भिशीमध्ये ५० रुपयांपासून शे-पाचशे रुपयांपर्यंत कुवतीनुसार गुंतवणूक करतात. अशा भिशी त्यांच्यासाठी आर्थिक आधार ठरत असल्या तरी भिशीच्या नावाखाली अशा अडल्या-नडलेल्यांकडून पैसे गोळा करायचेच आणि पैशाची मागणी वाढली की सावकारकीचा पैसा त्यात मुरवायचा अशी क्लृप्ती वापरली जाते. यातून पैशाच्या वसुलीसाठी आपोआपच दहशत व आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार घडताना दिसतात.
चौकट
: बालिंग्यातील सराफाचे परराज्यात पलायन
उपनगरात व शेजारच्या गावात अशा भिशी बिनदिक्कत चालविल्या जात असल्या तरी फसवणूक झाली तरी अडल्या-नडलेल्यांकडून सहसा तक्रारी केल्या जात नाहीत. मात्र, बालिंगा सराफ फसवणूक प्रकरणानंतर अशा भिशा पुन्हा चर्चेत आल्या. या सराफाने भिशीधारकांना छापील पासबुक दिली आहेत. बालिंग्यातील सराफ संतोष पोवाळकर विरोधात तक्रारदार पुढे येत असताना त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत; पण तो पत्नीसह परराज्यात फरार झाल्याची चर्चा आहे.