कोल्हापूर : कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगातील भीष्माचार्य ज्येष्ठ उद्योजक आणि झंवर ग्रुपचे अध्यक्ष रामप्रताप शिवनारायण झंवर (वय ८७) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. जीवनात अशक्य असे काहीच नाही हे सूत्र अंगी बाळगून उद्योग क्षेत्रात त्यांनी यशस्वी वाटचाल केली. त्यांच्या निधनामुळे उद्योगक्षेत्रातील भावी पिढीचे मार्गदर्शक हरपले आहेत.गेल्या १५ दिवसांपूर्वी ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरमधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सांगली जिल्ह्यातील आष्टा हे त्यांचे मूळ गाव.पुणे इंजिनिअरींग कॉलेजमधून मेकॅॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी किर्लोस्कर कंपनीत नोकरी केली.
येथे आठ वर्षे नोकरी केली. पुढे सन १९६६ मध्ये कोल्हापूर आले. सुरूवातीला उद्योजक पंडितराव कुलकर्णी यांच्यासमवेत भागीदारीमध्ये ऑईल इंजिनचे क्रँकशाफ्ट निर्मितीचा उद्योग सुरू केला. पद्मा ब्रँड विकसित केला. सन १९८४ मध्ये त्यांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर उद्योजक झंवर यांनी स्व:मालकीची आर. एस. झेड इंडस्ट्रीज, श्रीराम फौंड्री सुरू केली.
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी झंवर ग्रुपचा विस्तार केला. त्या माध्यमातून जगभरात झंवर ग्रुपसह कोल्हापूरचा ठसा उमटविला. उद्योगासह सामजिक क्षेत्रात ही ते कार्यरत होते. त्यांनी कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन, स्मॅॅक, आदी संघटनांच्या अध्यक्षपदाची त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांना विविध संघटना, संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित केले होते.