कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दोन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री उशिरा राज्य शासनाने घेतला. ही निवडणूक लांबणीवर जाण्यासंदर्भातील वृत्त यापूर्वी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.या संदर्भातील आदेश सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढला आहे. ही निवडणूक १२ फे ब्रुवारीला होणार होती. राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. भोगावती कारखाना ‘अ’ वर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेली संस्था असल्याने सार्वजनिक निवडणुकीवेळी ही निवडणूक घेतली जाऊ नये, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे सूचविले होते. काँग्रेसबरोबर भारतीय जनता पक्षालाही ही निवडणूक आता नको होती. त्यामुळे भाजपने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात अग्रह धरला होता. गेल्या आठवड्यात त्यासंबंधी जिल्ह्यात जोरदार चर्चा झाली; पण त्या दिवशी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी असा काही आदेश सरकारने काढला नव्हता, असे स्पष्टीकरण केले होते. त्यामुळे निवडणुकीसंदर्भातीलसंदिग्धता निर्माण झाली होती. आता ही संदिग्धता सरकारने आदेश काढल्याने दूर झाली आहे. ही निवडणूक आता दोन महिन्यांनंतर घेण्यात येणार असल्याचे शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी रमेश शिंगटे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे काँग्रेससह भाजपची राजकीय सोय झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ही निवडणूक आताच हवी होती; परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ‘भोगावती’चे काँग्रेसचे माजी संंचालक विश्वनाथ पाटील यांनी सहकारमंत्र्यांकडे दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय झाला आहे.
‘भोगावती’ची निवडणूक अखेर दोन महिने लांबणीवर
By admin | Published: January 28, 2017 1:13 AM