लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्याने ओढे-नाले प्रवाहित झाले असून, नद्यांच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कुंभी, कासारी, घटप्रभा, तुळशी, पंचगंगा, भोगावती नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, अगोदरच तुडुंब वाहणाऱ्या भोगावती नदीचे पाणी या हंगामात पहिल्यांदाच बाहेर पडले आहे. लालभडक पाणी पाहण्यासाठी नागरिकांची भोगावती काठावर गर्दी होऊ लागली आहे. भोगावती परिसरात पावसाला सुरुवात भोगावती : भोगावती परिसर आणि राधानगरी तालुक्यांत रविवारी पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवार रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी रविवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाने शेतकरी सुखावला असून, शेतीच्या कामाला वेग आला आहे. या परिसरात खरिपाच्या हंगामाला अत्यंत वेळेत सुरुवात झाली होती, मात्र पावसाने काही काळ दडी मारल्यामुळे खरीप पेरणीवर संकट निर्माण झाले होते. भोगावती नदीत पुरेसे पाणी नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, काल पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसाने ऊस, भुईमूग, भात, नाचणा, आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. शाहूवाडीत शेतीकामांना वेग : मलकापूर : मलकापूर परिसरात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतीकामांना गती आली आहे. या पावसामुळे पिकांना उभारी मिळाली आहे. मृग नक्षत्रात हुलकावणी दिलेल्या पावसाने तब्बल दहा दिवसांनी दमदार सुरुवात केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पेरलेल्या भाताला पावसाची गरज असताना कडक ऊन पडल्यामुळे भातपीक वाया जाते की काय अशी भीती निर्माण झाली होती. गेल्या महिन्यात मान्सूनपूर्वी पेरलेल्या भाताला तरतरी आली आहे. धूळवाफ पेरणीची भाताची मशागत सुरू आहे.राऊतवाडी धबधबा पर्यटकांनी फुललाराधानगरी : पर्यटकांचे आकर्षण असलेला राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे प्रवाही झाला आहे. उंच कड्यावरून दरीत कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी नजरेतून झेलण्यासाठी पर्यटकांची पावले इकडे वळत आहेत. कालपासून सलग सुट्ट्यांमुळे येथे वर्दळ वाढली आहे. राधानगरी धरणाच्या डाव्या बाजूने हत्तीमहाल, पडळी ते दाजीपूरपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला हा धबधबा आहे. या ठिकाणापासून जवळच धरणाचे पात्र सुरू होते. सध्या धरण रिकामे असल्याने विस्तृत पसरलेल्या रिकाम्या पात्राचे दर्शन होते. याच परिसरातून धरणातील ऐतिहासिक बेनझीर व्हिला येथे जाता येते. अजून बरेच दिवस ही वाट रिकामी असणार आहे. वन्यजीव विभागाच्या निसर्ग पर्यटन योजनेतून या परिसरातील काही सुधारणा करण्यासाठी पन्नास लाखांची कामे मंजूर झाली आहेत. मात्र, अजून त्याला सुरुवात झालेली नाही. ही कामे झाल्यावर पर्यटकांना आणखी आनंद घेता येणार आहे.
‘भोगावती’चे पाणी पात्राबाहेर
By admin | Published: June 26, 2017 12:27 AM