तानाजी पोवार -- कोल्हापूर -नेत्यांचा आदेश डावलून भोगावती सहकारी साखर कारखान्यात सुमारे ५८० जणांच्या केलेल्या ‘जंबो नोकरभरती’मुळे कारखान्यावर वार्षिक सात कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे सानुग्रह अनुदान व पगारावर सुमारे ३२ कोटी रुपये खर्च करणारा राज्यातील ‘भोगावती’ हा एकमेव साखर कारखाना ठरणार आहे. दरम्यान कारखाना चेअरमन धैर्यशील पाटील यांनी विभागप्रमुखांच्याकडे दिलेल्या नोकरभरतीच्या यादीत आपली नावे नसल्याने या याद्या कारखाना कार्यस्थळावरच संतापाने फाडण्याचा प्रकारही तीन विभागांत घडल्याने तणाव निर्माण झाला होता. गत निवडणुकीत राष्ट्रवादी व शेकापने युती करून काँग्रेसच्या हातून कारखान्याची सत्ता काढून घेतली. सत्ता आल्यानंतर नोकरभरतीचा प्रश्न अनेकवेळा चव्हाट्यावर आला; पण त्या-त्यावेळी आर्थिक अडचणी वाढणार असल्याने या प्रश्नाला बगल देण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील हे ‘या नोकरभरतीमुळे किरकोळ बोजा पडणार,’ असे म्हणत आहेत मात्र ३९३ पेक्षा जादा कर्मचारी भरले तर राजीनामा देण्याची धमकी त्यांनी सर्व संचालकांना यापूर्वी दिली होती, मात्र याचाही विसर त्यांना पडला आहे. गुरुवारी या ‘जंबो नोकरभरती’च्या आॅर्डर त्या-त्या विभागप्रमुखांकडे दिल्या होत्या. त्याची माहिती मिळाल्यानंतर कारखान्यातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपली नावे यादीत आहेत का पाहण्यासाठी आपापल्या विभागप्रमुखांना घेरले. कारखान्यातील उत्पादन, इंजिनिअर्स व स्टोअर्स या तीन विभागांत काम करणाऱ्या अनेक रोजंदारी कर्मचाऱ्यांना या यादीत आपले नाव नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी ‘लाखो’ली वाहत या तीन विभागांतील नोकरभरतीच्या याद्याच संतापाने फाडून टाकल्या. दरम्यान, या जंबो नोकरभरतीवरून शुक्रवारी सत्तारूढांचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी अनेक संचालकांना दूरध्वनीवरून कानपिचक्या दिल्या; आपला आजही या नोकरभरतीला विरोध असल्याचे त्यांनी ठामपणे यावेळी सांगितल्याचे समजते. मुश्रीफांचा ‘हंटर’ गायबकाँग्रेसच्या ताब्यातून राष्ट्रवादी आणि शेकापने या कारखान्याची सत्ता तब्बल वीस वर्षांनी काढून घेतली. त्यानंतर दि. २७ जून २०११ रोजी कारखाना कार्यस्थळावर विजयी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात, कारखान्याची सत्ता या भोळ्या-भाबड्या सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून दिली आहे. विश्वासाने दिलेल्या कारभारात गैरकारभार झाल्यास हसन मुश्रीफ हे स्वत: हंटर घेऊन उभारतील व सभासदांना न्याय देतील, असे भावनिक आवाहन माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी या विजयी मेळाव्यात केले होते. त्यास उपस्थित सभासदांनी प्रचंड प्रतिसाद दिला; पण तो हंटर आज मुश्रीफ चालविणार का? अशी विचारणाही सभासदांमधून होत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार सहा महिने थकलेकारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने कारखान्यातील ७८० कायम कर्मचाऱ्यांचे पगार सुमारे सहा महिने थकले आहेत. याशिवाय मागील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या यादीतील ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘घरचा रस्ता’ दाखविला आहे; तर सुमारे ७०० कर्मचाऱ्यांना गतहंगामातील पगारच अद्याप दिला नसल्याची वस्तुस्थिती आहे.नोकरभरती करणार नसल्याचे साखर सहसंचालकांना पत्रकारखान्यात नोकरभरती करणार नसल्याचे पत्र चेअरमन धैर्यशील पाटील यांच्या लेटरहेडवर कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी दि. १८ नोव्हेंबर २०१५ रोजी साखर सहसंचालक सचिन रावळ यांना दिले आहे तरीही ही नोकरभरती झाली आहे.
‘भोगावती’वर अतिरिक्त सात कोटींचा बोजा पडणार
By admin | Published: December 05, 2015 12:57 AM