भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात ६ लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवून सुरुवात करायची आहे. त्यासाठी सभासदांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांनी केले आहे.
भोगावती साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील रोलरपूजन अध्यक्ष पी.एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, भोगावतीचा कारभार आम्ही अत्यंत काटकसरीने चालवला आहे. ऊस उत्पादकाचे देणे भागवले आहे. त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामात कारखान्याच्या सर्व सभासदांनी आपला सर्व ऊस भोगावतीशिवाय बाहेरील कारखान्याला घालू नये. साखर कारखानदारी अतिशय संकटातून चालत आहे. त्यामुळे सर्व जण एकसंघ राहून या संकटाला तोंड देत सामना करत राहू. त्यावेळी आपल्याला यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर म्हणाले की, साखर कारखानदारी चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी सर्व घटकांनी एक होऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी भोगावतीच्या तोडणी-ओढणी, सभासद आणि कर्मचाऱ्यांनी एकसाथ राहून काम करू या. यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी.डी. धुंदरे, सुशील पाटील-कौलवकर, ज्येष्ठ संचालक ए.डी. पाटील, राधानगरी तालुका काँग्रेसचे संचालक हिंदूराव चौगले, कार्यकारी संचालक संजय पाटील, सर्व संचालक, कर्मचारी सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले.
फोटो : १२ भोगावती कारखाना
परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्यात रोलरपूजन करताना कारखान्याचे अध्यक्ष पी.एन. पाटील, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, ए.डी. पाटील व सर्व संचालक.