यवलूज : पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांश गावातील तलाठी कार्यालयात पैशाच्या हव्यासापोटी सर्वसामान्य जनतेची कामे आडवून ठेवण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून महसूल विभागाच्या आंधळ्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्याच्या गावपातळीवर तलाठी हा महसूल खात्याचा कणा मानला जातो. गावातील नागरिकांबरोबर शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाची महत्त्वपूर्ण सेवा देणारे स्थानिक चावडी कार्यालय यंत्रणा उभी असते. शेतजमिनीच्या महसूल कामकाजाबरोबर सातबारा, विविध कामासाठी लागणारे दाखले, वारसा नोंद अर्ज, बोजा दाखल करणे या कामी स्थानिक सज्जामध्ये नागरिकांना नेहमीच हेलपाटे मारावे लागत असतात, हे काही त्यांच्यासाठी नवीन नाही. परंतु यवलूज (ता. पन्हाळा) येथील कर्करोगाशी झुंजत असलेल्या कृष्णात विठ्ठल गुरव या शेतकऱ्याला सातबारा दुरुस्तीसाठी तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ चावडी व मंडल अधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागले असून आजही त्यांना तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे ऐकवण्यात हे अधिकारी धन्यता मानत आहेत.
नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबावी या उद्देशाने युती शासनाने चावडी कार्यालयात बहिस्त कर्मचाऱ्यांना काम करता येणार नाही, असा आदेश केला असतानाही तत्कालीन तलाठी यांच्या सज्जाकडील नागरिकांच्या महसूल कामासाठी बहिस्त कर्मचाऱ्याचे काम काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता मात्र गेले अनेक दिवस आपल्या सातबारा दुरुस्ती कामासाठी चावडीत येरझाऱ्या मारणाऱ्या गुरव यांना त्यांनी सादर केलेली कागदपत्रेच सापडत नसल्याचा अजब सल्ला त्यांना तलाठी व मंडल अधिकारी देऊ लागले आहेत.
त्यामुळे अशा चावडी कार्यालयातील भोंगळ कारभाराविरोधात महसूल विभागाकडे कोण वाली आहे का, असा संतप्त सवाल गुरव व नागरिकांतून विचारला जात आहे.
चौकट - माझ्या अधिकार कार्यक्षेत्रांतील चावडी कार्यालयाची हजारो प्रकरणे येत असल्याने मी प्रत्येक काम बघू शकत नाही. मला सध्या कोरोना महामारीची कामे दिली असल्याने सोमवारी चौकशी करा. तेव्हाही अचानक कोणती मीटिंग लावली तर मी तिकडेही जाऊ शकतो. -मंडल अधिकारी अजय लुगडे.
मी कर्करोगाचा रुग्ण असून काही दिवसांपूर्वी माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तरीही माइया जमिनीच्या सातबारा ऑनलाईन चुकीच्या दुरुस्तीकामी मी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तत्कालीन तलाठी यांच्याकडे दिली आहेत. गेले दीड वर्ष हेलपाटे मारत असून सध्या माझे प्रकरणच गहाळ झाले असल्याचे संबंधित अधिकारी मला आता सांगत आहेत. वरिष्ठांनी या गलथान कारभाराची गंभीर चौकशी करावी. -कृष्णात विठ्ठल गुरव, शेतकरी यवलूज.