कोल्हापूर: भुदरगड नागरी पतसंस्थेतील कर्जदारांसाठी ओटीएस योजना लागू करा, चुकीच्या पद्धतीने झालेली लिलाव प्रक्रियेची सखोल चौकशी करा, अशा सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा सहनिबंधक, उपनिबंधकांसह सहकारातील अधिकाऱ्यांना दिल्या. गुरुवारी भुदरगड थकबाकीदार कर्जदारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन कर्जदार व अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणला.
भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्या,गारगोटी ही पतसंस्था अवसायनात निघाली आहे, पण, सध्या अवसायक मंडळाकडून कर्जदारांना कर्ज वसुलीच्या नोटिसा लागू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आमदार आबीटकर यांनी कर्जदारांशी सहानुभूतीने वागण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस प्रभारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, लेखापरीक्षक व अवसायक मंडळ सदस्य डी. बि.यादव, विशेष कार्यकारी अधिकारी हर्षवर्धन यादव, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक दत्तात्रय उगले, कल्याण निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आबूभाई तहसीलदार उपस्थित होते.
भुदरगड नागरी पतसंस्था दुर्दैवाने अडचणीच्या फेरीत अडकली परंतु संस्थेकडे कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी पतसंस्थेवर अवसायक मंडळ नेमल्यानंतर सक्तीने कर्ज वसुली सुरू झाली. यामुळे कर्जदार सततच्या नोटिसांमुळे भीतीच्या छायेखाली जगत आहेत. या सर्व कर्जदारांना मानवतेच्या भावनेतून मदत करण्याकरिता अवसायक मंडळाने सहकार्य करावे असेही आबीटकर यांनी सूचित केले.
चौकट
कर्जदारांना रडू कोसळले....
बैठकीत व्यथा मांडताना अनेक कर्जदारांचे डोळे पाणावले तर काहींना रडूच कोसळले. अवसायक मंडळाकडून सुरू असलेल्या कर्ज वसुली प्रक्रियेमुळे नाधवडे, ता.भुदरगड येथील कर्जदार शामराव पाटील यांनी कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांचे भाऊ उमाजी पाटील यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. काही कर्जदारांनी सोने गहाण कर्जावेळी दिलेले सोने संस्थेकडे प्रत्यक्षात नसून आम्ही पैसे भरण्यास तयार असूनही संस्था आमचे सोने परत देत नसल्याचे सांगितले. उद्योग- व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने संस्थांच्या प्राॅपर्टी व जमिनींवर बोजा चढविण्यात आलेले आहेत. ओटीएस करिता तयार असणाऱ्या कर्जदारांनाही योजनेपासून वंचित ठेवून त्यांच्याकडून सक्तीने कर्जवसुली करत असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. यावेळी काही कर्जदारांना आपल्या व्यथा सांगताना रडूही कोसळले.
फोटो: ०२०९२०२१-कोल-भुदरगड
फोटो ओळ: अवसायनात गेलेल्या भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या थकबाकीदार कर्जदारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी गुरुवारी शासकीय विश्रामगृहावर आमदार प्रकाश आबीटकर यांनी सहकारातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी कर्जदारांनी आपल्या व्यथा मांडल्या.