कोल्हापूर : भाजपच्या भुदरगड पंचायत समितीच्या एकमेव सदस्य आक्काताई नलवडे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याच तालुक्यातील पदाधिकाऱ्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने पाटील यांना हा धक्का मानला जातो.
शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नलवडे यांनी सोमवारी सकाळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख खासदार संजय मंडलिक व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ‘गोकुळ’चे नूतन संचालक नंदकुमार डेंगे, राहुरी कृषी विद्यापीठ संचालक दत्ताजी उगले, बाजार समिती संचालक कल्याण निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी सभापती बाबा नांदेकर, माजी उपसभापती मदन देसाई, प्रभारी सभापती सुनील निंबाळकर, संदीप वरंडेकर, विजय बलुगडे, माजी सभापती कीर्ती देसाई, भुदरगड तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, प्रवीण नलवडे, राधानगरी तालुकाप्रमुख भिकाजी हळदकर, अरविंद पाटील, संभाजी भोकरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. सध्या पंचायत समितीचे सभापतीपद रिक्त असून, त्या जागी नलवडे यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगण्यात येते.
०७०६२०२१ कोल आक्काताई नलवडे
भाजपच्या भुदरगड पंचायत समितीच्या सदस्य आक्काताई नलवडे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.