गारगोटी : भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांनी मुसंडी मारली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप यांनी ठिकठिकाणी सोयीच्या आघाड्या करून स्थानिक पातळीवर निवडणुका लढविल्या. अकरा गावांमध्ये सत्तांतर तर अनेक ठिकाणी सत्ता कायम राखण्यात दिग्गज नेत्यांना यश आले. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी.पाटील, भाजपचे राहुल देसाई, नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत, काँग्रेसचे सचिन घोरपडे यांनी सोयीच्या ठिकाणी आघाड्या केल्या होत्या. यंदा प्रथमच आबिटकर गटाने नेत्रदीपक यश संपादन करत अनेक गावावर झेंडा फडकवला. या पाठोपाठ राष्ट्रवादीने जागा मिळविल्या आहेत.
पाचर्डे, पाटगाव, मुरुकटे या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर उर्वरित ४१ गावांत स्थानिक आघाड्यांनी मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत पक्षीय राजकारणाला तिलांजली देऊन सोयीचे राजकारण करण्यात आले. काँग्रेस पंधरा गावात सहयोगी पक्षाच्या सोबत सत्तेत आली आहे. या निवडणुकीत ११ ठिकाणी सत्तांतर झाले. दिगग्ज नेत्यांनी स्थानिक नेत्यांशी आघाडी करून सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जन्मगाव खानापूर येथील निवडणूक लक्ष्यवेधी ठरली होती. या ठिकाणी शिवसेनेचे बी. डी. भोपळे यांनी सहा जागा जिंकून सत्ता हस्तगत केली. या ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. भाजपला दोन आणि राष्ट्रवादीला एक अशा तीन जागांवर समाधान मानावे लागले. यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत यांनी सर्वांना एकत्र घेऊन शिवसेनेच्या बी.डी. भोपळे यांच्या विरोधात आघाडी केली होती.
आदमापूर येथे गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे आणि बाजार समितीचे माजी संचालक दत्तामामा पाटील यांच्या आघाडीचा पराभव करून विजय गुरव आणि धैर्यशील भोसले या नवोदितांच्या आघाडीने मुसंडी मारली. म्हसवे येथील बिद्रीचे संचालक मधुकर देसाई यांच्या विरोधात शिवसेनेच्या संजय देसाई आणि भाजपचे हेमंत देसाई अशी तिरंगी लढत झाली. निकराच्या लढतीत मधुकर देसाई यांनी बाजी मारली.
गंगापूर येथे हुतात्मा वारके सूतगिरणीचे चेअरमन पंडितराव केणे यांनी त्यांचे पारंपरिक विरोधक भाजपचे प्रकाश कुलकर्णी, हमीदवाडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांना सोबत घेऊन आमदार आबिटकर गटातील तानाजी जाधव, अजित जाधव पाटील यांच्या विरोधात आघाडी बनवली होती. या ठिकाणी पंडितराव केणे यांना सत्ता अबाधित राखण्यात यश आले.
................
कल्याण निकम यांनी गड राखला
बसरेवाडी येथे आमदार आबिटकरांचे निकटवर्तीय कल्याण निकम यांची पंचवीस वर्षे सत्ता कायम राखण्यात यश मिळाले. त्यांच्या विरोधात प्रवीण देवेकर यांच्या आघाडीचा पराभव झाला.
पश्चिम भागात कोकण केसरी के.जी. नांदेकर यांच्या साथीने आमदार आबिटकर गटाचे वर्चस्व राहिले. सतरा पैकी बहुतांश आघाडीला यश मिळाले. सुरवातीलाच पाचर्डे येथे बिनविरोध करत शिवसेनेने खाते उघडलेले होते.
फणसवाडी येथे उपसभापती सुनील निंबाळकर यांची दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणत राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या आघाडीने सत्ता हस्तगत केली.
..............
पाच उमेदवार चिठ्ठीवर विजयी
समान मते पडल्याने तांब्याचीवाडी येथील आघाडीप्रमुख प्रकाश परब, नागणवाडी येथील सिंधुताई साळवी, मठगाव मानी येथे अमोल मेंगाने, सालपेवाडी येथे दत्तात्रय झोरे, बेगवडे येथे स्वप्नील चव्हाण या पाच जणांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले.