गारगोटी : भुदरगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. राजकीय ज्वर शिगेला पोहचला आहे, प्रचंड इर्षा वाढलेली आहे. उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्यात शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद दाखवण्यासाठी चढाओढ सुरू आहे.तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीपैकी पाचर्डे,वासणोली, पाटगाव, मुरुक्टे या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ४१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. पक्षीय राजकारणाला तिलांजली देऊन सोयीच्या स्थानिक आघाड्या निर्माण झाल्या आहेत. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने आघाड्या बनलेल्या आहेत. उघड प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून पदयात्रा, रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.
अखेरच्या टप्प्यात साम, दाम,दंड,भेद या नीतीचा वापर सुरू असून पाहुण्यांचा पाहुणा शोधून मतपरिवर्तन करण्यात आहेत. प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हसवे येथे तिरंगी लढत होत आहे.माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर येथे शिवसेनेचे बी.डी. भोपळे यांच्या रांगणा माऊली आघाडीच्या विरोधात भाजपचे सरचिटणीस प्रविणसिंह सावंत हे तळेमाऊली आघाडीच्या माध्यमातून भाजप,राष्ट्रवादी, काँग्रेस यांना सोबत घेऊन निकराचा लढा देत आहेत. गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायत बिनविरोध केली होती.खानापूर बरोबरच गंगापूर, म्हसवे,नाधवडे,बसरेवाडी गावातील निवडणूक लक्षवेधी होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागलेले आहे.