गारगोटी : भुदरगड पोलिस ठाण्याच्या जीर्ण होत आलेल्या इमारतीस राज्य शासनाने एक कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. याबाबतच्या मंत्रालयीन पाठपुरावाकामी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात गारगोटी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी जिल्हा पोलिसप्रमुख व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भुदरगड पोलिस ठाण्याच्या इमारत बांधकामाचा पाठपुरावा करीत असल्याचे सूतोवाच केले होते. तसेच पोलिसांच्या निवासाची इमारत, आदींबाबत पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.सध्याची भुदरगड पोलिस ठाण्याची इमारत ही ब्रिटिशकालीन इमारत तहसील भुदरगड व वन विभाग, आदी शासकीय कार्यालयांना संलग्न आहे. भुदरगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी अत्यंत कमी जागेत वर्षानुवर्षे आपला कारभार करीत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने ही इमारत अत्यंत अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर गारगोटीत आता नव्या भुदरगड पोलिस ठाण्याची सुसज्य इमारत वैभवात भर घालणार आहे. भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे ब्रिटिश इमारतीतच गेली अनेक वर्षे पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू आहे. एकीकडे कामाचा वाढता ताण, तर दुसरीकडे सुविधांची वानवा, अशा अवस्थेत पोलिस काम करीत होते. जागेअभावी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना व्हरांड्यातच टेबल टाकून बसावे लागत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू होते. आमदार प्रकाश आबिटकर यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुंबईत मंत्रालयात मंत्री व अधिकारी यांच्या बैठका झाल्या. याला यश येऊन भुदरगड पोलिस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी एक कोटी ६५ लाख २८ हजार निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. (प्रतिनिधी)राधानगरी मतदारसंघातील राधानगरी, भुदरगड, आजरा या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी गेली दोन वर्षे प्रयत्नशील आहे. गारगोटीचा विषय मार्गी लागला. याकामी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य मिळाले. याबरोबरच राधानगरी व आजरा पोलिस ठाण्यांचा विषय लवकरच मार्गी लागेल.-आमदार प्रकाश आबिटकर
भुदरगड पोलिस ठाण्याचे रूप पालटणार
By admin | Published: April 26, 2017 11:59 PM