कोल्हापूर : शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये भूमिपूजन होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी केली. वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, ग्रंथालय इमारत, शवविच्छेदन गृह या चार इमारतींना भेटी दिल्या.मंत्री मुश्रीफ म्हणाले, या अद्ययावत हॉस्पिटलचे शासन स्तरावरील प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता हे काम अतिशय वेगात सुरू आहे. निधीचा प्रश्नही डिसेंबरपर्यंत पूर्ण करून त्यांचा लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे सांगितले. तसेच; नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या केंद्रासाठीसुद्धा जागा मिळवण्यासाठी लवकरच मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे.
असे होणार हॉस्पिटल...
- अकराशे बेडचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल
- न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत
- निवासी डॉक्टर्स व आंतरवासितांकरिता पुरुष वसतिगृह- क्षमता २५०
- निवासी डॉक्टर्स व आंतरवासितांकरिता महिला वसतिगृह- क्षमता २५०
- मुलींचे वसतिगृह- क्षमता १५०
- मुलांचे वसतिगृह- क्षमता १५०
- परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता ३००
- अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण