श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन
By विश्वास पाटील | Published: February 10, 2024 01:17 PM2024-02-10T13:17:21+5:302024-02-10T13:19:33+5:30
गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर संस्थान मठाला दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट
कोल्हापूर- गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे- पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, अभियंता अभिजित चौगुले, नूलच्या सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील,जयसिंगराव चव्हाण, गुरुकुल मधील शिष्यगण मुरगेंद्र हिरेमठ, ईश्वर स्वामी, गणेश जंगम, शिवानंद स्वामी, कार्तिक हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी अंदाजे ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या भवनातून सर्वसामान्यांची मंगलकार्य व इतर कार्य संपन्न होणार आहेत. या भवनात सैनिक पूर्व प्रशिक्षण वर्ग, स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र व सेंद्रीय शेती प्रशिक्षण केंद्र असणार आहे. सीमा भागातील नागरिकांसाठी हे भवन उपयुक्त ठरणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री सुरगीश्वर संस्थान मठाला भेट देऊन गुरु लिंगैक्य ष.ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच श्री सुरगीश्वर मठाची पाहणी करुन मठाधिपती श्री गुरुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामिजींसोबत संवाद साधला.
श्री सुरगीश्वर संस्थानने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या श्रीसुरगीश्वर सांस्कृतिक भवनच्या माध्यमातून कोल्हापूरच्या अध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीला गती देण्याचे काम घडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत केले. श्री सुरगीश्वर संस्थानच्या वतीने करण्यात येणारी सेंद्रिय शेती, गुरुकुल व सामाजिक उपक्रमांची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली.