कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा घोटाळ्यात माझा कसलाही संबंध नसताना माजी उपमहापौर भूपाल शेटे नाहक बदनामी करण्याच्या हेतूने माझी विश्वासार्हता मलिन करण्याचा प्रयत्न आहेत. म्हणून आपण त्यांच्याविरोधात आज (शनिवारी) लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मानहानीचा फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महापालिकेचे अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भूपाल शेटे यांनी ज्या पाच प्रकरणांत मी दोषी असल्याचा दावा केला आहे, त्या चार प्रकरणांतील मिळकतधारकांची बिले तयार झाली तसेच त्यांनी ती भरलेलीसुध्दा आहेत. तरीही त्या प्रकरणांत महापालिकेचे नुकसान झाले, असे सांगितले जात आहे. हे एक षडयंत्र असून, त्यात महानगरपालिकेतील काही झारीतील शु्क्राचार्य सामील आहेत. मी पोलीस ठाण्यात दिलेली फिर्याद खोटी ठरविण्याचा प्रयत्न शेटे करत आहेत, असेही भोसले यांनी सांगितले.
घरफाळा घोटाळाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासकामी काही पूरक माहिती पोलिसांनी मागितली होती, ती सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांना द्यायची आहे. ही माहिती पोलीस ठाण्यात पोहोचली नाही, तोपर्यंत भूपाल शेटे यांच्या हातात पडते यावरुनच हा षडयंत्राचा भाग असल्याचे दिसून येते, असे भोसले यांनी सांगितले.
-औंधकरांविरोधात तक्रार करणार-
माहितीच्या अधिकारात औंधकर यांनी पोलिसांना द्यायची माहिती भूपाल शेटे यांना दिली. हा प्रकार चुकीचा आहे. माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन आहे. न्यायालयात चार्जशीट दाखल होईपर्यंत पोलिसांना दिलेली माहिती कोणाला द्यायची नसते, पण औंधकर यांनी ती दिली. म्हणून मी त्यांच्याविरोधात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, संचालक नगरपालिका प्रशासन आणि महापालिका प्रशासक यांच्याकडे लेखी तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जाहीर आरोपाबाबत .....
माझ्यावरील आरोपाबाबत मी स्वत: प्रशासनाला तीनवेळा निवेदन देऊन संबंधित मिळकतधारकांची बिले निघाली आहेत. त्यांनी त्यानुसार घरफाळासुध्दा भरलेला आहे. हा मुद्दा खोडून काढा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, माझ्या निवेदनाचा विचारच केला नाही. शेवटी मी आयुक्तांच्या नावे कायदेशीर नोटीस दिली आहे. तरीही त्यात सुधारणा झालेली नाही, असे भोसले म्हणाले.