कोल्हापूर : निसर्गमित्र संघटना, राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच इतर निसर्ग संस्थांच्यावतीने नववर्षानिमित्त ३० डिसेंबर ते १ जानेवारी यादरम्यान ‘निसर्गाकडे चला’ असा संदेश देत तीन दिवसीय सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत श्रमदानाच्या माध्यमातून रानमोडी तणाचे उच्चाटन करण्यात येणार आहे. ‘निसर्गमित्र’चे अध्यक्ष मधुकर बाचूळकर व प्रकल्प संयोजक दिनकर चौगुले यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर ते पन्हाळा या मार्गावर तालुक्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत, तरुण मंडळे, महिला बचत गट यांच्यामध्ये पर्यावरण जागृती विषयी कृतिशील प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शेती व सह्याद्रीच्या जंगलसंपदेवर अतिक्रमण करणाऱ्या रानमोडी नावाच्या तणाची माहिती विद्यार्थी व ग्रामस्थांना देण्यात येईल. त्याचबरोबर पर्यावरणपूरक जीवनशैली, दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याच्या दृष्टिकोनातून पाणी वाचवूया, स्थानिक प्रजातीचे वृक्ष लावूया, कचऱ्यापासून खत व गॅस निर्माण करूया, सौरऊर्जेचा वापर करून विजेचा वापर जपून करूया, व्यसनापासून दूर राहूया, आदी विषयांची चर्चा व तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) दुपारी साडेचार वाजता शाहू मिलसमोरच्या प्रांगणात होणार आहे. तरी महाविद्यालयाचे विद्यार्थी व निसर्गप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
‘निसर्गाकडे चला’ संदेशासाठी सायकल फेरी
By admin | Published: December 26, 2014 11:03 PM