कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील अटक केलेल्या संशयित आरोपींना २० जूनला होणाऱ्या सुनावणीसाठी हजर करावे, असे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये दोषारोपपत्राद्वारे नवीन चार कलमे वाढविण्यात आली आहेत.अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरूंदकर (रा. भार्इंदर पूर्व, जि. ठाणे), एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजू पाटील (रा. तळवेल, ता. भुसावळ, जि. जळगाव), कुरूंदकरचा कारचालक कुंदन भंडारी, कुरूंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर (रा. आजरा) या चौघांना अटक केली आहे.
फळणीकर याने हत्येची कबुली दिल्याने तपासाची गती वाढली आहे. मंगळवारी खटल्यावर सुनावणी झाली. त्यामध्ये चार्जफ्रेम आधारे नवीन चार कलमे वाढविली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुरुंदकर याच्या जामीन अर्जावर २० जूनला सुनावणी होणार आहे.
या दिवशी अटक आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुनावणीला संशयित फळणीकर, आरोपीचे वकील हजर होते. कुंदन भंडारीचे वकील गैरहजर होते. विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.