लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : बिद्री साखर कारखान्याने आतापर्यंत ११३ दिवसांत ७ लाख ६० हजार १८१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ५५ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे तर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस ३१ मार्चअखेरपर्यंत गाळप केला जाईल, असे प्रतिपादन ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले.
बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्यात सन २०२०-२१ गळीत हंगामातील उत्पादित ७ लाख ५५ हजार क्विंटल साखर पोत्यांचे पूजनप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, कारखान्याची एफआरपी ३०७५ रुपये असून ३१ जानेवारी २०२१ अखेर आलेल्या उसाची एकरकमी एफआरपी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केली आहे. यापुढे सव्वालाख टन ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्व ऊस मार्चअखेरपर्यंत गाळप करूनच कारखाना बंद करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कारखान्याने पुढील हंगामात प्रतिदिन साडेसात हजार मेट्रिक टन गाळप क्षमता वाढविण्यासाठी शासनाच्या सर्व परवानग्या मिळविली असून यासाठी लागणारी मशिनरी व सिव्हील कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे.
यावेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांच्यासह संचालक, अधिकारी, कामगार उपस्थित होते.
.............
०२ बिद्री शुगर
फोटो
बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात उत्पादित ७ लाख ५५ हजार क्विंटल साखर पोत्यांचे पूजन करताना कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई व संचालक मंडळ ( छाया : चांदेकर फोटो, बिद्री)