रमेश वारकेबोरवडे : साप असा शब्द उच्चारला तरी माणसाला घाम फुटतो. निसर्गाने निर्माण केलेला हा सुंदर जीव सृष्टीच्या जीवनचक्रातील एक महत्त्वाचा घटक आहे.घोणस आणि तिच्या ७३ पिल्लांना बिद्री ( ता. कागल ) येथील सर्पमित्र सयाजी चौगले यांनी जीवदान दिले. ही घोणस आणि तिची पिल्ली राहत्या घरात किंवा आजूबाजूच्या घरात शिरण्याआधीच पकडली गेली. सर्पमित्र सयाजी चौगले यांनी दाखविलेल्या या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.कुर येथील बाजीराव कुंडलिक मिसाळ यांना राहत्या घरी साप दिसल्याने त्यांनी सयाजी चौगले यांना फोनवरुन कल्पना दिली. सयाजी यांनी हा साप पकडला असता तो घोणस जातीचा मादी साप असल्याचे दिसून आले. त्यांनी या सापाला पोत्यामध्ये बंद करून कात्यायनी जंगलात सोडण्यास नेले असता ती प्रसुत होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतू तोपर्यंत १० पिल्ली जंगलात गेली तर उष्माघाताने तीन पिल्लांचा मृत्यू झाला.त्यांनी या घोणस सापाला परत पोत्यात घालून घरी आणले; तोपर्यंत तिने आणखी ६३ पिल्लांना जन्म दिला होता. या पिल्लांचा व्यवस्थितपणे जन्म झाल्यावर सयाजी चौगलेंनी घोणस व तिच्या ६३ पिल्लांना संध्याकाळी थंड वातावरणात कात्यायनी जंगल परिसरात सोडून दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे घोणस व पिल्लांचा जीव वाचल्याने त्यांना जणू पुनर्जन्मच मिळाला.
वास्तविक घोणस जातीच्या सापांचा नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा प्रजननाचा काळ असतो. परंतु बदलत्या वातावरणामुळे क्वचित प्रसंगी अवेळीही प्रजनन होऊ शकते. पकडलेल्या मादी आणि पिल्लांना सुरक्षितपणे जंगलात सोडून दिले आहे. - बाजीराव कुदळे व सयाजी चौगले (सर्पमित्र )