कोल्हापूर : ‘भारतीय कामगार कायद्याची माहिती व अंमलबजावणी’ या विषयावर द्विवार्षिक चौथे राज्य अधिवेशन कोल्हापुरातील दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे रविवारी (दि. २८ ) दोन सत्रांत होणार असल्याची माहिती बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी कर्मचारी फोरमचे परिमंडळ सचिव संभाजी कांबळे यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. नियोजन आयोगाचे माजी सदस्य व माजी खासदार भालचंद्र मुणगेकर व ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार यांचे ‘भारतीय कामगार कायदे व त्यांची अंमलबजावणी’ या विषयावरील परिसंवाद दुसऱ्या सत्रात होणार आहे.संभाजी कांबळे म्हणाले, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येऊ नये. ग्राहकाभिमुख सेवा देण्याकरिता प्रशासनास उपाय सुचवणे, आदी विषयांवर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. या अधिवेशनाला महिला व बालकल्याण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्णातील आमदार, महापौर तृप्ती माळवी तसेच महानिर्मिती, महावितरण, महापारेषणचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुणे येथील बहुजन फोरमचे अध्यक्ष शिवाजी वायफळकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, तर दुसऱ्या सत्रात होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान केंद्रीय सल्लागार बहुजन फोरमचे डी. के.दाभाडे भूषविणार असल्याचे संभाजी कांबळे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष एस. पी. कांबळे, सरचिटणीस राजन शिंदे, प्रमुख संघटक धर्मभूषण बागूल, सुरेश केसरकर, गणेश दांगट, इंद्रजित कांबळे, शिवाजी देशमुख, विश्वास कांबळे, गोकुळ कांबळे, विनोद कांबळे, अनिल काजवे, सतीश कांबळे, सर्जेराव कांबळे, आदी उपस्थित होते.
द्विवार्षिक चौथे राज्य अधिवेशन रविवारी
By admin | Published: December 26, 2014 12:27 AM