कोल्हापूर : राज्यातील २००-२५० घराण्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र लुटला आहे. एका-एकाकडे किती कारखाने आहेत? गोरगरिबांच्या मालकीचे साखर कारखाने कमी किमतीमध्ये विकत घेतले. आगामी काळात मजबूत सरकार येणार असून, चौकशी लावून सगळ्यांचा हिशेब चुकता केला जाईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
कॉँग्रेसचे माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.पाटील म्हणाले, पक्षांतर का होत आहे. गेली ७० वर्षे या देशावर नेहरू घराण्याने सर्वाधिक काळ राज्य केले आणि त्याच कुटुंबातील व्यक्तींनी नेतृत्व केले पाहिजे, असा आग्रह राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उमेदवारी दिली नाही, त्यांना पराभूत केले. संसदेत बोलू दिले नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांना पुढे येऊ दिले नाही. ही तुमची परंपरा असून शरद पवार ती पुढे चालवीत आहेत. बारामतीत मुलगी, मावळमध्ये पार्थ पवार आणि आता विधानसभेला रोहित पवारच लागतो, असेही पाटील म्हणाले.प्राप्तीकर व ईडीचे छापे हे कोणी सांगून टाकले जात नाहीत. १५ दिवसांत छाप्यांचे डिझाईन तयार होत नसते. त्यासाठी प्राप्तीकर विभागाला दोन-तीन वर्षे मेहनत घ्यावी लागते. पण जिल्ह्यातील काही मंडळी छाप्यांचे भांडवल करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला त्यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला.
१३ ऑगस्टला मोठा बॉम्ब फुटेलभाजपकडे प्रवेशासाठी मोठी रांग लागली आहे. खूप बॉम्ब फुटायचे आहेत. मुख्यमंत्री दर आठवड्याला मंगळवारी पक्षप्रवेशाचे कार्यक्रम ठेवणार आहेत. कोल्हापुरातही १० दिवसांनी असा कार्यक्रम होणार आहे. १३ ऑगस्टला कोल्हापुरात मोठा बॉम्ब फुटणार आहे. हा नेता कोण, यावरून राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पक्षप्रवेशाची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.