कोल्हापूर : ‘आधुनिक भारताचे मवाळ नेते’ अशी ओळख असणाऱ्या गोपाळकृ ष्ण गोखले यांनी अवघ्या ४९ वर्षांत देशाच्या विकासात भरीव योगदान दिले. संशोधकवृत्तीने प्रश्न मांडून ते तडीस नेण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन गोपाळकृष्ण गोखले यांचे पणतू डॉ. सुनील गोखले यांनी मंगळवारी केले.शिवाजी विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्र आणि राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘गोपाळकृष्ण गोखले : आधुनिक भारताचे मवाळ नेते’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.डॉ. गोखले म्हणाले, अवघ्या १९ व्या वर्षी गोपाळकृष्ण गोखले हे डेक्कन एज्युकेशन संस्थेचे आजिव सदस्य झाले. त्यांनी या संस्थेचा विकास केला. दक्षिण अफ्रिकेतील मजुरांचा प्रश्न, देशातील मोफत व सक्तीचे शिक्षण, आदीं प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडून त्यांची सोडवणूक केली. काँग्रेसचेदेखील नेतृत्व केले. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात पारदर्शक कसे राहावे, चारित्र्य कसे घडवावे, याचा वस्तुपाठ गोपाळकृष्ण गोखले यांनी घालून दिला. त्याचे अनुकरण सर्वांनी करणे गरजेचे आहे.कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, आदी उपस्थित होते. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी स्वागत, तर डॉ. प्रकाश पवार यांनी आभार मानले. चर्चासत्रानिमित्त गोखले यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडविणारे चित्रप्रदर्शन देखील होते.
गोपाळकृष्ण गोखलेंचे विकासात मोठे योगदान
By admin | Published: February 03, 2015 11:37 PM