कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणीपट्टी तसेच घरफाळा थकबाकी असणाऱ्या ग्राहकांनी चालू बिलाच्या मागणीसह मागील थकबाकी एकरकमी भरली, तर त्यांना मोठी सवलत देण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घेतला. ही सवलत योजना शासकीय कार्यालयांना लागू होणार नाही. या निर्णयामुळे पाणी पुरवठा विभागाची थकबाकी ३८ कोटींपर्यंत वसुली होईल, असा विश्वास बलकवडे यांनी व्यक्त केला.कोल्हापूर शहरात एक लाख दोन हजार ३५८ पाणी कनेक्शन असून, त्यापैकी ७६ हजार ७४२ पाणी ग्राहक थकबाकीदार आहेत. थकबाकीची एकूण रक्कम ही ४८ कोटी ५७ लाख ६७ हजार ११८ इतकी आहे; तर विलंब आकार, दंडाची रक्कम १५ कोटी ८० लाख ०८ हजार ५९० एवढी आहे.चालू मागणीसह पाणीपट्टीची संपूर्ण थकबाकी फेब्रुवारीअखेर एकरकमी भरली, तर संबंधित ग्राहकांना ४० टक्के विलंब आकार, दंडात सवलत देण्यात येणार आहे. जे ग्राहक मार्चअखेर सर्व थकबाकी भरतील त्यांना ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यापूर्वी ज्यांनी अशी सवलत घेतली आहे, ते ग्राहक या सवलतीस पात्र असणार नाहीत, असे डॉ. बलकवडे यांनी सांगितले. ही सवलत योजना शासकीय कार्यालये वगळून घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांना लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या योजनेमुळे महापालिका नळ कनेक्शन असलेल्या ग्राहकांना तीन कोटी ६० लाखांची सवलत मिळेल, तर महापालिकेची थकबाकी ३८ कोटींपर्यंत वसुली होईल, असा विश्वास बलकवडे यांनी व्यक्त केला.आयटीपार्कचे कनेक्शन तोडलेथकबाकीच्या कारणास्तव येथील आयटी पार्कचे कनेक्शन तोडण्यात आल्याचे तसेच आयटीआय व बिंदू चौक सबजेलला दोन दिवसात थकबाकी भरा अन्यथा कनेक्शन तोडण्यात येईल, अशी नोटीस देण्यात आल्याचे जल अभियंता नारायण भोसले यांनी सांगितले.घरफाळ्यातही सवलत शहरातील सर्व अनिवासी (व्यावसायिक) मिळकतींनासुध्दा सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. एक हजार चौरस फुटाच्या आतील अनिवासी मिळकतधारकांनी त्यांची चालू मागणीसह संपूर्ण थकबाकी फेब्रुवारीअखेर एकरकमी भरल्यास दंड व्याजात ५० टक्के सवलत, तर मार्चअखेर भरल्यास चाळीस टक्के सवलत देण्यात येईल. एक हजार चौरस फुटापेक्षा अधिक बांधकाम असलेल्या अनिवासी मिळकतधारकांना फेब्रुवारी अखेर थकबाकी भरल्यास ४० टक्के, तर मार्च अखेर भरल्यास ३० टक्के सवलत दिली जाणार आहे, असे सहायक आयुक्त विनायक औधकर यांनी सांगितले.निवासी मिळकतधारकांना यापूर्वी अशी सवलत देण्यात आली होती, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक हजार फुटाच्या आतील निवासी मिळकतधारकांना जानेवारीपर्यंत ७० टक्के, फेब्रुवारपर्यंत ६० टक्के, तर मार्चपर्यंत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. तर एक हजार स्केअर फुटाच्यावरील मिळकतींना हीच सवलत अनुक्रमे ५०, ४० व ३० टक्के अशी देण्यात येत आहे.
पाणीपट्टी व घरफाळा थकबाकीत मोठी सवलत, मोठ्या वसुलीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 2:08 PM
Muncipal Corporation Kolhapur- गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणीपट्टी तसेच घरफाळा थकबाकी असणाऱ्या ग्राहकांनी चालू बिलाच्या मागणीसह मागील थकबाकी एकरकमी भरली, तर त्यांना मोठी सवलत देण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घेतला. ही सवलत योजना शासकीय कार्यालयांना लागू होणार नाही. या निर्णयामुळे पाणी पुरवठा विभागाची थकबाकी ३८ कोटींपर्यंत वसुली होईल, असा विश्वास बलकवडे यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देपाणीपट्टी व घरफाळा थकबाकीत मोठी सवलत, मोठ्या वसुलीची अपेक्षा प्रशासक कादंबरी बलकवडे यांचा मोठा निर्णय