समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी दिव्यांगांना बॅटरीवरील ट्रायसिकल देण्याचे सूतोवाच केले आहे. यासाठी मोठ्या निधीची गरज असून, देखभाल दुरुस्तीसाठी केंद्रे उघडावी लागणार आहेत. सध्या दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी या बॅटरीवरील ट्रायसिकल उपयुक्त असल्याचे सांगितले.सध्या दिव्यांगांना हाताने चालवता येणाऱ्या तीन चाकी सायकल्स दिल्या जातात. रस्ता चढाचा असेल तर अशांना या सायकल चालवताना मोठा त्रास होतो. अन्य कुणाची तरी मदत घ्यावी लागते. रस्ता खाचखळग्यांचा असेल तर त्याचाही मोठा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कटारिया यांची ही घोषणा दिलासादायक आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी लगेच होण्याची गरज आहे.आनंदवन येथील दिव्यांग कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार म्हणाले, या बॅटरीवरील ट्रायसिकल्स दिव्यांगांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. ४० हजारपासून पुढे या सायकलची किंमत आहे. अशा पध्दतीच्या सायकल्स दिव्यांगांचा शारीरिक त्रास कमी करण्यास हातभार लावतील. ‘आनंदवन’मध्येही अशा सायकल्स वापरण्यात येतात.लेखिका सोनाली नवांगुळ म्हणाल्या, या सायकल्स उपयुक्त ठरतील. पण त्यासाठी आपल्याकडील रस्त्यांची स्थिती याचाही विचार करण्याची गरज आहे. ‘हेल्पर्स आॅफ दि हॅण्डीकॅप्ड’ संस्थेचे उपाध्यक्ष पी. डी. देशपांडे म्हणाले, अशा सायकल्सचा वापर आम्ही सुरू केला होता. परंतु त्यावेळी रस्त्यांची अवस्था आणि देखभालीचा खर्च यामुळे आम्ही त्याचा सातत्यपूर्ण वापर करू शकलो नाही. याच संस्थेमध्ये कार्यरत असलेले आणि स्वत : व्हीलचेअरचा वापर करणारे अविनाश कुलकर्णी यांनी अशा ट्रायसिकल उपयुक्त ठरतील, मात्र देखभाल दुरुस्तीची व्यवस्था तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले.अशा बॅटरीवरील ट्रायसिकल्सची किंमत जादा असल्याने साहजिकच सर्वसामान्य दिव्यांग ही खरेदी करू शकणार नाही. त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारनी मिळून यासाठी स्वतंत्र कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. एकदा या सायकल आणून लाभार्थ्यांना दिल्या की त्याच्या देखभाल दुरुस्तीची केंद्रे किमान जिल्ह्याला एक याप्रमाणे सुरू करावे लागेल. अन्यथा सायकल्स नादुरुस्त झाल्या, बॅटरी चार्जिंग होण्यामध्ये अडथळे आले; तर मग या सायकल्स पडून राहणार आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात ट्रायसिकल्सचे वितरणयाआधीच राज्याचे माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांगांना बॅटरीवरील ट्रायसिकल्स देण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या अंतर्गत काम करणाऱ्या ‘एल्मिको’ कानपूर येथेही या ट्रायसिकल्स तयार करण्यात येतात. या फोटोमध्ये दिसणारी बॅटरीवरील ट्रायसिकल ही चंद्रपूर जिल्ह्यात वितरित करण्यात आली आहे.
बॅटरीवरील ट्रायसिकलसाठी मोठ्या निधीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 4:01 PM
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी दिव्यांगांना बॅटरीवरील ट्रायसिकल देण्याचे सूतोवाच केले आहे. यासाठी मोठ्या निधीची गरज असून, देखभाल दुरुस्तीसाठी केंद्रे उघडावी लागणार आहेत. सध्या दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी या बॅटरीवरील ट्रायसिकल उपयुक्त असल्याचे सांगितले.
ठळक मुद्देबॅटरीवरील ट्रायसिकलसाठी मोठ्या निधीची गरजदेखभाल दुरुस्तीसाठी केंद्रे उघडावी लागणार