कोल्हापूर : पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यांत धुमाकूळ घातलेल्या ‘बडे गँग’ या कुख्यात संघटित टोळीच्या प्रमुखाला कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथे अटक केली. विलास महादेव बडे (वय २६, रा. चाटगाव, ता. माजलगाव, जि. बीड. सध्या रा. मुधोळ कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. धारुर (जि. बीड) येथून पोलीस कोठडीत असताना पोलिसांना गुंगारा देऊन तो पळून गेला होता. त्याच्यावर ‘मोका’ अंतर्गत कारवाई प्रस्तावित होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.देशमुख म्हणाले, बडे गँगचा प्रमुख विलास बडे हा साथीदारासोबत महामार्गावर वाहने अडवून त्यांना लुबाडत होता, त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. त्याने पुणे, अहमदनगर, बीड, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी रोड रॉबरीचे गुन्हे करताना शिक्रापूर पोलिसांनी त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. याशिवाय या टोळीवर नेकनूर पोलीस ठाणे, युसुफ वडगाव पोलीस ठाणे, नेकनूर पोलीस ठाणे, बर्दापूर पोलीस ठाणे, धारुर पोलीस ठाणे या ठिकाणी रोड रॉबरीचे गुन्हे दाखल आहेत; त्यामुळे गुंड विलास बडे याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई प्रस्तावित होती.पोलीस कोठडीतून पलायनविलास बडे या गुंडाला धारुर पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी नोव्हेंबर २०१७ मध्ये तो पोलिसांच्या कोठडीतून पळून गेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्या पलायनाची माहिती बिनतारी संदेश व सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली होती. त्या वेळेपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.बसची वाट पाहताना पकडलेबडे या गुंडाची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी दोन पोलिसांची पथके तयार करून तपास सुरू ठेवला. विलास बडे हा गुंड सध्या कर्नाटकातील मुधोळ गावी राहण्यास असून, तो बुधवारी सांगली फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यावरून पोलिसांनी कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिरोलीनजीक सांगली फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी सांगली फाटा येथे बडे हा प्रवाशांच्या गर्दीमध्ये लपून बसची वाट पहात होता. यावेळी त्याला चारही बाजूने गर्दीत घेरून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिले.