कोल्हापूर : शिवसेनेत प्रवेशासाठी अनेक मातब्बर तयार असून त्यांची यादी मोठी असल्याचे तयार असल्याचे शिवसेनाकोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना एक नंबरच पक्ष असेल, असा दावा ही त्यांनी केला. गांधी मैदानातील मल्टी स्पोर्ट्स टर्फ मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.मंत्री सामंत म्हणाले, प्रवेश फक्त तुमच्याकडेच होत आहेत असे नाही तर १५ दिवसांनंतर आमच्याकडेही प्रवेश होणार आहेत. तुमच्याकडील मातब्बर नेते देखील आमच्याकडे येण्यास तयार आहेत. त्यांची नावे आताच सांगत नाही. खासदार संजय मंडलिक आणि क्षीरसागर यांच्याकडील यादी इतक्यात जाहीर करू नये, असे कोणीही समजू नये शिवसेना कमजोर आहे. शिवसेना महापालिकेत एक नंबरला राहिल आणि शिवसेनेचा भगवा फडकवू. आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांच्या पाया खालची वाळू सरकणार आहे.क्षीरसागर यांनी फिरंगाई तालीम प्रभागासाठी २५ लाखांचा निधी दिला असून आणखी २५ लाखांचा निधी देणार असल्याचे सांगितले. शिवसेना शहराचा विकासासाठी कटिबद्ध असून शहरवासीयांनी शिवसेनेचे ८१ उमेदवार विजयी करावेत, असे आवाहन केले. शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी भाजपवर निशाना साधला. माजी नगरसेवक तेजस्विनी इंगवले, राहुल चव्हाण, नियाज खान, मंजित माने आदी उपस्थित होते.हातात केवळ ढाल, तलवार नाहीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे सर्व खासदारांचा निधी गोठवला आहे. त्यामुळे आम्ही नुसतेच खासदार असून हातात ढाल आहे, मात्र, तलवार नाही, अशी स्थित असल्याचा टोला खासदार संजय मंडलिक यांनी लगावला.