अभिनय आणि चित्रकला या दोन्ही असामान्य देणग्या लाभलेल्या चंद्रकांतदादांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ ला कोल्हापूर येथे झाला. घरची परिस्थिती जेमतेम, निसर्गाचे आकर्षण, जबरदस्त सृष्टीसौंदर्य आवड, दादा निसर्गवेडे झाले. वडिलांनी त्यांचे मित्र बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत नोकरीस लावले. बाबा गजबर यांच्या हाताखाली दादांचे चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी चित्रकलेत चांगली प्रगती केली. मोठी पोस्टर्स करू लागले, रंगसंगतीची किमया ते बाबूराव पेंटर यांच्याकडून शिकले.
शालिनी सिनेटोनमध्ये पोस्टर्स रंगविणाऱ्या दादांना योगायोगाने बाबूराव पेंटर यांच्या ‘‘सावकारी पाश’’ बोलपटात भूमिका करायला मिळाली. दादांनी त्या भूमिकेचे व संधीचे सोने केले. त्यातून सिनेसृष्टीच्या क्षीतिजावर एक नवा तारा उदयास आला. अल्पकाळात भालजी पेंढारकर यांच्या सान्निध्यात आले. त्यांचे मूळ नाव गोपाळराव या नावात बदल करून ‘चंद्रकांत’ असे नाव बाबांनी ठेवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
डॉ. चंद्रकांत मांडरे यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द अविस्मरणीय ठरली. त्यांनी ७७ मराठी चित्रपट, १४ हिंदी चित्रपट व १ इंग्रजी चित्रपट, त्यामध्ये जिवंत अभिनयाची एक दुनिया निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भूमिका भालजींच्या चित्रपटातून त्यांनी साकारली, ती मराठी माणसाच्या मनात अविस्मरणीय ठरली. अयोध्येचा रामचंद्र असू दे, दुष्ट रावणाची भूमिका असू दे, रंगेल पाटलाच्या पोराची भूमिका असू दे... पांढरपेशा प्रेमवीरापर्यंत विविध भूमिका या श्रेष्ठ अभिनेत्याने वठविल्या. मराठी चित्रपटसृष्टीत बुजूर्ग अभिनेता म्हणून दादांचा उल्लेख प्रामुख्याने होतो. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्याबरोबर २७ चित्रपटांत चंद्रकांत (दादांनी) एकत्र भूमिका केल्या.
चंद्रकांतदादांनी काढलेल्या काही चित्रांना आज ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गेली ७० वर्षे त्यांनी अनेक चित्रे काढली. आजपर्यंत त्यांनी ४०० हून अधिक निसर्गचित्रे रंगविली. दादांच्या अनेक चित्रांना सुवर्णपदके, पारितोषिके मिळाली. पावडर शिडींग ही लुप्त होत चाललेली कला त्यांनी अतिशय प्रेमाने जोपासली व वाढविली. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात प्रामुख्याने राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांच्याहस्ते राष्ट्रपती पारितोषिक, श्रीमती इंदिरा गांधी यांच्याहस्ते राष्ट्रपती पारितोषिक, चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार (महाराष्ट्र शासनाकडून), चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टतर्फे शाहू पुरस्कार, कोल्हापूर महानगरपालिकेचा कोल्हापूर भूषण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठाची डी.लिट्. हे सन्माननीय पदवी... असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
हा सारा चित्रांचा खजिना पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावा व सहजासहजी पाहण्यासाठी उपलब्ध व्हावा, म्हणून त्यांनी राजारामपुरीतील आपला राहता बंगला व निसर्गचित्रे शासनाकडे सुपूर्द केली. एक कलाघर दान करून, कलापूर हे नाव सार्थ केले, आर्ट गॅलरी लोकार्पण केली. दादा रोज डायरी लिहित असत. त्यातूनच त्यांनी नवीन पिढीस मार्गदर्शन ठरावे यासाठी आपले आत्मचरित्र लिहिले, ‘देवा शपथ खरे लिहीन’. चित्रपट कलावंताच्या घराचे घरपण टिकवून ठेवण्याचे काम शशिकलाताई मांडरे यांनी केले व त्या दादांच्या सावलीप्रमाणे त्यांच्याशी बरोबर राहिल्या व संग्रहालय म्हणजे त्या दोघांचे प्रेमाचे प्रतीक आहे, असे म्हणावे लागेल.
- विश्वास काटकर