शिवाजी सावंत
गागोटी:गेले अनेक महिने झाले बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्वस्त मंडळ यांच्या मनमानी भ्रष्टाचारी कारभार विरुध्द भक्तांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली होती.त्याचा आज सोमवारी (दिं.२४)रोजी निकाल होऊन विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले.धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी हा निकाल दिला.तर प्रशासकपदी शिवराज नायकवडी यांनी निवड झाली आहे. त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.प्रशासक म्हणून अधीक्षक शिवराज नाईकवाडे,निरीक्षक एम .के.नाईक व निरीक्षक श्रीनिवास शेनॉय यांची नेमणूक केली आहे.
अधिक माहिती अशी की आदमापुर ता.भुदरगड येथील संत बाळूमामा मंदिरात विश्वस्त मंडळांतील काही कारभाऱ्यांनी मनमानी कारभार करून कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार केला असल्याची खात्री आणि पुराव्यातून प्रवीण पाटील बिद्री (ता.कागल)रवींद्र नारायण पाटील फये (ता. भुदरगड),हणमंत दत्तात्रय पाटील आकुर्डे (ता.भुदरगड) यांनी याचिका दाखल केली.त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे ९ऑगस्ट २०२१ रोजी या विरोधात याचिका दाखल केली.या याचिकेत विश्वस्त मंडळावर पुराव्यानिशी आरोप करण्यात आले होते.याचिकाकर्त्यानी ' बाळूमामा मंदिरात जमा होणारे दान हे गोरगरीब जनतेचे आणि कष्टकरी भक्तांचे आहे.या दान रक्कमेवर तत्कालीन कार्याध्यक्ष मगदूम यांनी योग्य विनियोग केला नसल्याचा आरोप होता.
न्यायालयाने सर्व पुरावे तपासून विश्वस्त मंडळ बरखास्त केले तर पोलिस पाटील आणि सरपंच या पदसिध्द विश्वस्तांना दोषमुक्त केले.शिवराज नायकवडी यांची प्रशासक तर आणखी दोन सदस्य अशी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली.त्यांनी सोमवारी रात्री देवस्थान मंदिराच्या कारभाराचा ताबा घेतला आहे.
ठळक आरोप एकाच जमिनीची दोन महिन्यात दोन वेळा खरेदी,७६ लाख रूपयांची पहिली खरेदी तर दोन महिन्यांनी तीच जमीन आठ कोटी रुपयांना,जमिनीचे मूळ मालक दिनकर सत्तू कांबळे हे असताना महाराष्ट्र इंजिनियरिंग वर्कच्या नावे पैसे आरटीजीएस,पाण्याचे एटीएम बसविण्यासाठी शोभा संदीप मगदूम यांना सहा लाख रुपयेचे मशीन बसविण्याचा ठेका ,यात जमा होणाऱ्या रक्कमेतून सत्तर टक्के मगदूम यांना पैसे , बग्यात जमा होणाऱ्या दान रक्कम दोन तीन दिवसांनी जमा, दुकानाचा करार दोन वर्षे अकरा महिने असताना जवळच्या लोकांचे पाच पाच वर्षांचे करार मंदिरातील दान पेटीत जमा होणारे दान काढताना अथवा मोजताना व्हिडिओ शूटिंग नाही.जमा झालेली रक्कम चार दिवसांनी जमा केली जाते.