कोल्हापूर : विकासाच्या दिशेने वाटचाल करणाºया रवांडा या आफ्रिकेतील देशामध्ये कोल्हापूरमधील उद्योजकांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कौशल्य विकासाला याठिकाणी प्राधान्य आहे, अशी माहिती केंद्र सरकार आणि फिक्कीचे सल्लागार मुनीश गुप्ता यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील कोल्हापूर कॉलिंग, फिक्कीतर्फे आयोजित चर्चासत्रासाठी ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सल्लागार गुप्ता म्हणाले, आफ्रिकेतील रेवांडासह अन्य देशांचे अर्थकारण हे कृषीक्षेत्रावर अवलंबून आहे. कोल्हापूरमध्ये कृषी आणि कृषी उत्पादन प्रक्रियेवर आधारित उद्योग,व्यवसायांची मोठी परंपरा आहे. शिवाय या उद्योग, व्यवसायांनी प्रगती साधली आहे. त्यामुळे रवांडा व अन्य आफ्रिकन देशांमध्ये कोल्हापूरच्या उद्योजकांना अमर्याद संधी आहेत. रवांडा हे उद्योगासाठी सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सुरक्षीत आहे.
कॉनवर्स इंटरनॅशनल बिझनेस नेटवर्कचे अध्यक्ष कुलभूषण बिरनाळे म्हणाले, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रामधील एक सर्जनशीलता कोल्हापूरमध्ये आहे. येथील उद्योजकांनी मर्यादा ओलांडून जगासमोर जावे यासाठी फिक्की, चेंबर आॅफ कॉमर्सचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर कॉलींगचे पारस ओसवाल म्हणाले,
भारतातील उद्योग जगतात मंदीचे वातावरण आहे. येथील उद्योजकांना उभारणी देण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली जात आहे. तेथील सरकार आपल्या उद्योजकांना अनेक सवलती देत आहे. त्याचा फायदा आपल्या उद्योजक, व्यावसायिकांनी घेणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
आपल्या देशाची आठ केंद्रे
रवाडांच्या नागरिकांना कौशल्यावर आधारीत शिक्षण देण्यासाठी तेथील सरकारचे विविध स्वरुपातील प्रयत्न सुरू असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, यासाठी परदेशातून एखादा कौशल्यपूर्ण व्यक्ति, कारागीर आल्यास त्याला कौशल्यांचे शिक्षण देणारी संस्था सुरू करण्यास अर्थसहाय्य देखील केले जाते. आपल्या देशाने रवाडांमध्ये कौशल्य विकासाची आठ केंद्र सुरू करण्यासाठी निधी दिला आहे.