सचिन भोसलेकोल्हापूर : वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही बाब जाणून देवकर पाणंदमधील लवेश विश्वजित बकरे या बारा वर्षीय मुलाने बांबू, काथ्या आणि गवताच्या कांड्यापासून अगदी हुबेहूब नैसर्गिक वाटावीत, अशी चिमण्यांसाठी घरटी बनविली आहेत. त्याने ही घरटी शनिवारी आपल्या वाढदिवसानिमित्त निसर्गप्रेमींना मोफत वाटली.वाढते शहरीकरणामुळे चिमण्यांना आपल्यासह पिल्यांना घरटी बनविताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यात तौउतेसारख्या वादळामुळे तर अनेक घरटी आतमध्ये घातलेल्या अंड्यांसह खाली पडून खराब झाली. ही बाब छोट्या लवेशच्या मनाला लागली. त्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत मनावर घेऊन अगदी हुबेहूब नैसर्गिक वाटावीत अशी बांबूपासून व गवताच्या वाळलेल्या काड्यापासून ५० घरटी बनविली. त्यातील काही स्वत: आसपासच्या झाडावर जाऊन मित्रांसोबत लावलीही. तर उरलेली घरटी त्याने शनिवारी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्यांना आपल्या घराच चिमणीची घरटी हवी आहेत. अशा निसर्गप्रेमींनी ती मोफत वाटली.पर्यावरणप्रेमी राकेश खत्री यांच्याकडून लवेशची दखललवेशच्या या कामगिरीची दखल शनिवारी सकाळी फेसबुकवरून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेले दिल्लीतील पर्यावरणप्रेमी आणि नेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून सर्वत्र ओळख असलेले राकेश खत्री यांनी घेतली. लवेशला फोन करून त्याच्या कामाचे कौतुक केले. ते चालवीत असलेल्या मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. खत्री हे दिल्लीतून ही मोहीम चालवितात. तेही बांबू, ज्यूट आणि गवताच्या काड्यापासून अशी घरटी बनवून ती मोफत वाटतात. ही घरटी अनेकांनी घरामध्ये, इमारतीबाहेर लावली आहेत. त्या घरट्यांमध्ये चिमण्यांचा रहिवास वाढला आहे.