अमर मगदूम --राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी खुला झाल्याने अनेकांच्या इच्छांना पालवी फुटू लागली आहे. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत होईल, असे वाटत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपनेही या मतदारसंघावर दावेदारी दाखल केल्याने चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असून, भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना निर्णायक भूमिका पार पाडू शकतात. या निवडणुकीत बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गतवेळेस काँग्रेस-स्वाभिमानी संघटना आघाडी, राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्ष अशी तिरंगी लढत झाली होती. या लढतीत राष्ट्रवादीने निसटती बाजी मारली होती, तर राशिवडे पंचायत समिती मतदारसंघ राष्ट्रवादीकडे व धामोड पंचायत समिती मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला होता. या निवडणुकीत घराणी तीच पण दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील युवा नेत्यांची नावे चर्चेत आल्याने पुन्हा सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होणार? हे निश्चित आहे. पक्षांतर्गत असणारा विरोध ही दोन्ही काँग्रेसची डोकेदुखी ठरणार आहे. या मतदारसंघावर राशिवडे परिसराचे वर्चस्व असून, उमेदवारी देताना या परिसराला झुकते माप मिळत आले आहे. धामोड पंचायत समितीपेक्षा राशिवडे पंचायत समितीचे मतदार अधिक असल्याने नेत्यांना उमेदवारी देताना दमछाक होणार आहे. अशातच आगामी भोगावती साखर कारखान्याची निवडणूक व नियोजित सह्याद्री साखर कारखाना या निवडणुकीवर प्रभाव टाकणार आहे.या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असून, हा पक्ष एकसंघ राहणार काय यावरतीच इतर पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. राशिवडे परिसरात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीस तुल्यबळ आहेच. तुळशी व धामणी परिसरात राष्ट्रवादीची ताकद होती; मात्र बाळासाहेब नवणे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. मागील निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाशी आघाडी असूनही काँग्रेसने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा देत विजयापर्यंत नेले होते, तर राष्ट्रवादीतून बाळासाहेब नवणे यांनी फारकत घेतल्याने धामोड खोऱ्यातून मिळणारा पाठिंबा भाजपकडे गेला आहे. नवणे यांच्यासोबत कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित झाल्यास राष्ट्रवादीस त्याचा फटका सहन करावा लागणार आहे, तर राशिवडे परिसरातून बाजार समितीचे माजी अध्यक्ष कृष्णराव पाटील गटाची भूमिका राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची राहणार आहे.राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी खुला झाल्याने इच्छुकांची मांदियाळी आहे. काँग्रेसमधून सागर धुंदरे, जयसिंग खामकर, विश्वनाथ पाटील यांची, राष्ट्रवादीतून विनय पाटील, किसन चौगले, शिवाजी भाट, राजेंद्र पाटील, भाजपमधून बाळासाहेब नवणे, तर स्वाभिमानीतून प्रा. डॉ. जालंदर पाटील यांची नावे चर्चेत आहेत.राशिवडे पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण खुल्या गटासाठी असल्याने येथे इच्छुकांची संख्या जास्त आहे. उमेदवारीसाठी काँग्रेसमधून डॉ. जयसिंग पाटील, सम्राटसिंह पाटील, निवास डकरे, दिलीप पाटील इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादीतून अतुल पाटील, अजिंक्य गोणुगडे, संतू पाटील (वाघवडे), प्रकाश धुंदरे, धनाजी पाटील (कोदवडे), संजय मिसाळ यांची नावे आहेत. भाजपमधून दिलीप चौगले, अॅड. सुनील रणदिवे, विठ्ठल महाडेश्वर, आनंदा आदिगरे, बाळू पाटील (चांदे) इच्छुक आहेत.धामोड पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिलासाठी खुला झाल्याने येथे काँग्रेसमधून अंजना लहू पाटील, शीतल सुरेश खडके, माया दगडू चौगले, तर राष्ट्रवादीतून मीना राजेंद्र पाटील, तसेच भाजपमधून प्रमिला दीपसिंह नवणे, संगीता निवृत्ती नलवडे, तर अनुसया दत्तात्रय रावत (अपक्ष) यांची नावे चर्चेत आहेत.धामोड पंचायत समिती गणातील समाविष्ट गावेधामोड, केळोशी, म्हासुर्ली, लाडवाडी, नऊ नंबर, खामकरवाडी, बुरंबाळी, केळोशी खुर्द, पिपरेवाडी, कुरणेवाडी, जाधववाडी, सुतारवाडी, कुंभारवाडी, वळवंटवाडी, अवचितवाडी, माळवाडी, शिंदेवाडी, आपटाळ, मालपवाडी, कुदळवाडी, मोहितेवाडी, पिलारेवाडी, कोनोली, पाटीलवाडी, कुपलेवाडी, पाणारवाडी, पखालेवाडी, गावठाण, गवशी, पात्रेवाडी, गवशीपैकी पाटीलवाडी, जोगमवाडी, भित्तमवाडी, सावतवाडी.धनगरवाडे : हुंबेवाड, बाजरीवाडा, रातांबीवाडा, असंडोली, दांडगाईवाडा, चाफोडी, जोतिबा वसाहत, पादुकाचावाडा, मधलावाडा, अस्वलवाडी.
राशिवडेत इच्छुक उमेदवारांची भली मोठी रांग
By admin | Published: December 31, 2016 1:12 AM