कोल्हापूर : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाची धूळ चारल्यामुळे बेटिंगमध्ये मोठी उलथापालथ झाली. सलग दहा सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेला भारताचा संघ विजयाचा दावेदार होता. त्यामुळे अनेकांनी भारतीय संघावर बेटिंग लावले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे बेटिंगमध्ये पैसे लावणारे कंगाल झाले, तर बुकी मालामाल झाले.यंदाच्या विश्वचषकात पहिल्या सामन्यापासूनच बेटिंगमध्ये प्रचंड उलाढाल झाल्याचे सूत्र सांगतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड होते. फलंदाजी आणि गोलंदाजीतही भारतीय खेळाडू वरचढ असल्याने बेटिंग बाजारात भारताला प्राधान्य मिळाले होते. भारतीय संघावर ८० टक्के बेटिंग लागले होते, तर ऑस्ट्रेलियन संघावर २० टक्के बेटिंग लागले होते. भारतीय संघाने अंतिम सामन्यात कच खाल्ल्यामुळे बेटिंग लावणाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याउलट बेटिंग बुकी मात्र मालामाल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
कोल्हापुरातही जोरदार बेटिंगकोल्हापूर शहरासह गांधीनगरमध्ये ऑनलाइन बेटिंग घेतले जात होते. संपूर्ण सामन्याचा निकाल, खेळाडूंचे प्रदर्शन आणि ठराविक षटकांवरही बेटिंग लावले जात होते. मोबाइल ॲपद्वारे झालेल्या बेटिंगमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.