- उद्धव गोडसे/सरदार चौगले
कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर पडवळवाडीच्या हद्दीत नलवडे बंगल्याजवळ भरधाव कारने समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी (दि. १५) पहाटे पावणेचारच्या सुमारास घडला. अमोल बाबासो चिले (वय ४०, मूळ रा. जेऊर, ता. पन्हाळा, सध्या रा. कुंभारवाडी, ता. पन्हाळा) असे मृताचे नाव आहे, तर कारचालक सिद्धेश विक्रम मोरे (वय २७, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) हा जखमी झाला.
घटनास्थळ आणि करवीर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जेऊर येथील अमोल चिले हे गेल्या काही दिवसांपासून कुंभारवाडी येथे सासरवाडीत राहत होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात ते काम करीत होते. कामावर जाण्यासाठी शनिवारी पहाटे ते कुंभारवाडी येथील घरातून दुचाकीवरून बाहेर पडले. वाघबीळ घाटाजवळ नलवडे बंगल्यासमोर कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ते दुचाकीसह १५ ते २० फूट अंतरावर उडून पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात कारचालक सिद्धेश मोरे हा जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच करवीर पोलिस घटनास्थळी पोहोचले. अपघाताचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी सीपीआरमध्ये पाठवला. याबाबत मृत अमोल चिले यांचे भाऊ अजित बाबासो चिले (रा. जेऊर) यांनी फिर्याद दिली. मृत अमोल चिले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.