संचारबंदी असल्याने बहुतांश नागरिक घरातच आहेत. कार्यालयीन कामेही घरातूनच सुरू आहे. दुसरीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे घरातील पंखे, एसी, कुलर, टीव्ही, संगणक किंवा लॅपटॉप, आदी उपकरणांचा वापर वाढणार आहे. पर्यायाने विजेचा वापरसुद्धा वाढणार आहे. यातील पंखे, कुलर्स, आदींचा वापर १८ ते २४ तास होण्याची शक्यता आहे. या उपकरणांचा अनावश्यक वापर टाळावा. वीजवापराकडे लक्ष ठेवावे. यासाठी मीटरमधील केडब्लूएच ग्राहकांना रोज पाहणी करता येईल. जे ग्राहक दरमहा ८० ते ९० युनिट किंवा २८० ते २९० युनिट वीजवापर करतात, त्यांचा वीजवापर वर्क फ्रॉम होम आणि वाढत्या उन्हामुळे साधारणतः अनुक्रमे १०० किंवा ३०० युनिटपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्लॅबपुढील युनिटला दुसऱ्या स्लॅबचा दर लागणार आहे. घरगुती विजेच्या वापरासाठी दि. १ एप्रिलपासून नवीन दर लागू झाले आहेत, अशी माहिती महावितरणने दिली आहे.
चौकट
बिलाची पडताळणी करता येईल
कोरोनामुळे अनेक सोसायट्या किंवा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाली आहेत. त्यामुळे मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास ग्राहकांना सरासरी वीज बिल जाण्याची शक्यता आहे. मात्र, ग्राहकांनी स्वतः रीडिंग पाठविल्यास योग्य वीजवापराचे वीज बिल देण्यात येईल किंवा पुढील महिन्यात रीडिंग घेऊन प्रत्यक्ष केलेल्या वीजवापराचे स्लॅब बेनिफिटसह वीज बिल महावितरणकडून देण्यात येईल. महावितरणच्या मोबाईल ॲप अथवा संकेतस्थळावर ग्राहकांना त्यांच्या बिलाची पडताळणी करता येईल.