प्रकाश पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : खुपिरे (ता. करवीर) येथे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना रेसिडेन्शिअल अपार्टमेंट उभ्या करण्यात आलेले आहेत; पण गेली २५ वर्षे या इमारती वापराविना पडून आहेत. प्रशासनाला आपल्या हक्काची मालमत्ताही माहिती नसल्याचे चित्र आहे. खुपिरे येथे मिनी सीपीआरची संकल्पना तात्कालीन आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांनी समोर ठेवली होती येथील ग्रामीण रुग्णालयाची संरचनाही तसा दृष्टिकोन ठेवून खानविलकर यांनी केली होती. येथे सीपीआरमध्ये देण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर अधीक्षक दर्जाचा आरोग्य अधिकाऱ्याचे पदही येथे दिले होते. या ग्रामीण रुग्णालय नऊ गावांसाठी कार्यक्षेत्र असले तरी येथील सोयी-सुविधा मुळे करवीर पन्हाळा व गगनबावडा या तीन तालुक्यातील जनतेला ते आरोग्यासाठी आधारवड बनले आहे. येथील कर्मचाऱ्यांना २४ तास ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करता यावा यासाठी खुपिरे गावात दर्जेदार तीन मजली रेसिडेन्सियल अपार्टमेंट उभारण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या दर्जानुसार वन बी एचकेपासून थ्री बी एचके फ्लॅट आहेत. या सर्व इमारतींची त्याचवेळी रंगरोगोटी करून वीज, पाणी, कंपाउंडसह पार्किंगसाठी इमारतीच्या बेसमेंटमध्ये उत्तम पार्किंगची सोयही करण्यात आली आहे; पण ही इमारत आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत वापराविना पडून आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीची असणारी ही इमारत गेली २५ वर्षे वापरात आल्या नसल्याने इमारतीच्या बेसमेंटमध्ये शेणाचे व कचऱ्याचे ढीग आहेत. काही घरांचे सांडपाणी व गोबर गॅसचा मलमा या इमारतीच्या खालून वाहत आहे. पाण्याच्या सोयीसाठी ठेवण्यात आलेल्या टाक्या, विद्युत पंप, इमारतीतील इलेक्ट्रिक साहित्य व इतर वस्तू लंपास झाल्या आहेत.
चौकट
स्वच्छता केली की, इमारती वापरायोग्य
तीन अपार्टमेंटमध्ये वेगवेगळे युनिट तेही सर्व सोयींनी युक्त आहेत. केवळ स्वच्छता केली तरी वापर करता येईल.
शेळ्या-मेंढ्यांचा आसरा
पाऊस मोठा लागला की, या गावातील काही मेंढपाळ थेट इमारतीत शेळ्या-मेंढ्यांचे कळप घालतात. मोकाट कुत्री अवैध कामासाठीही याचा वापर केला जात असल्याच्या खुणा सापडतात.
240821\img-20210824-wa0109.jpg
फोटो
खुपीरे ता. करवीर येथे वापराविना पडून असलेली ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उभारण्यात आलेले रेसिडेन्सीयल तीन मजली सुसज्ज इमारत