कोल्हापूर : कोविडच्या काळामध्ये जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना पुरवठा केलेली औषधे आणि आवश्यक साहित्यापोटीची ३३ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. चार महिने उलटून गेले तरी रक्कम मिळत नसल्याने कंत्राटदारांच्या जिल्हा परिषदेकडे फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
गेल्यावर्षी कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक वस्तू, औषधे, पीपीई कीट, मास्क यासह विविध वस्तूंचा पुरवठा करण्यात आला होता. यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने सर्व खरेदी प्रक्रिया राबवण्यात आली होती. शेंडा पार्क येथील प्रयोगशाळा उभारणी करण्यापासून जिल्ह्याच्या सीमांवर मंडप घालण्यापर्यंत, संशयित रुग्णांच्या निवास व्यवस्थेपासून ते रेमडेसिवीर इंजेक्शनपर्यंतच्या खरेदीसाठी आतापर्यंत ८० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र तरीही अजून ३३ कोटी रुपयांची बिले अदा करावयाची बाकी आहेत.
यासाठी ३३ कोटी रुपयांची गरज असून या निधी मागणीचा तसा प्रस्ताव तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केला होता. परंतु अजूनही यातील निधी न मिळाल्याने या वस्तूंचा पुरवठा करणारे कंत्राटदार आता जिल्हा परिषदेकडे फेऱ्या मारत आहेत. राज्याच्या आपत्कालीन विभागाच्या निधीतून हा निधी अदा करण्यात येतो. तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होतो. त्यानंतर तो जिल्हा परिषदेला मिळणार आहे.
चौकट
अ. नं. पुरवठा केलेल्या वस्तू रक्कम रुपये
१ पीपीई कीट २ कोटी २३ लाख ६१ हजार
२ एन ९५ मास्क ४७ लाख ८७
३ हॅण्ड सॅनिटायझर २६ कोटी २० लाख
४ व्हीटीएम कीट ९२ लाख ६५ हजार
५ अन्टिजेन टेस्ट कीट ९२ लाख ५० हजार
६ रेमडेसिवीर ५ कोटी
७ अन्य औषधे १ कोटी ७५ लाख
८ बेड, गाद्या १ कोटी ४० लाख
९ एच्एफएनसी मशीन २ कोटी
१० कापडी मास्क १५ लाख
११ ग्लोव्हज् २० लाख
१२ हॉस्पिटल फर्निचर ५० लाख
१३ पल्स ऑक्सिमीटर १ कोटी २० लाख
१४ लॅब मटेरियल ७ कोटी ५० लाख
१५ मनुष्यबळ ८ कोटी ५० लाख