जयसिंगपूर : आंदोलन अंकुशच्या पोटातील मळमळ आम्ही समजू शकतो. कारण कितीही आदळआपट केली तरी शेतकरी त्यांना साथ देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. दत्त साखर कारखान्याच्या व्याजमाफीच्या करारपत्रावर कुठेही स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या नाहीत. साखर आयुक्तांनी ‘दत्त’ने व्याजापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना अदा केल्याने आंदोलन अंकुशचा दावा फेटाळला आहे. यामुळे राजू शेट्टींच्या व्देषाने पछाडलेल्या अंकुशकडून बिनबुडाचे आरोप होऊ लागले आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
राजू शेट्टी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी सह्या केल्या की नाही, हे सिध्द झालेले नाही. ऊस दर नियंत्रण अध्यादेशानुसार प्रलंबित ऊस दरापोटी सरासरी प्रतिटन १४ रूपये ५० पैसे व्याज त्यांना कारखाना देणे लागतो. प्रत्यक्षात त्यावर्षी दत्त कारखान्याने एफआरपीपेक्षा ३२ रूपये जास्त दिलेले आहेत. साखर आयुक्तांनी ‘दत्त’ने व्याजापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना अदा केल्यामुळे आंदोलन अंकुशचा दावा फेटाळला आहे. स्वत:च्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी असे आरोप आंदोलन अंकुश करत आहे. कारखानदारांकडून अशी बनवाबनवी होणार, हे माहिती असल्याने राजू शेट्टी यांनी १० फेब्रुवारी रोजी साखर आयुक्तांना निवेदन देऊन बोगस सह्यांच्या करारपत्राची चौकशी करण्याची मागणी केली होती. शेट्टी यांनी राज्यातील कारखान्यांच्या या भूमिकेविरोधात यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केल्या असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकावर सावकर मादनाईक, रामचंद्र फुलारे, आदिनाथ हेमगिरे, शैलेश आडके, सागर संभूशेटे, प्रकाश गावडे, राम शिंदे, सचिन शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.