कोल्हापूर : येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने आज, गुरुवारी सायंकाळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्रद्धादीप प्रज्वलित करण्यात आला. भारतमाता की जय, वंदे मातरम् , शहीद जवान अमर रहे... अशा घोषणांनी बिंदू चौक परिसर दुमदुमून केला. शहीद दिनानिमित्त शहरातून शहीद ज्योतीची मिरवणूकही काढण्यात आली. जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने २५ डिसेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी ‘शहीद अभिजित सूर्यवंशी शहीद दिन’ म्हणून पाळण्यात येतो. आजही यानिमित्ताने श्रद्धादीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते शहीद ज्योत प्रज्वलित करून नंतर मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिकामार्गे बिंदू चौक अशी ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. ही ज्योत बिंदू चौकात येताच भारतमाता की जय, वंदे मातरम्, शहीद जवान अमर रहे... अशा घोषणा देण्यात आल्या. अॅड. धनंजय पठाडे, डॉ. संदीप पाटील, नगरसेवक आदिल फरास, महापालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, उदय दुधाणे, सागर बगाडे, आदी मान्यवरांच्या हस्ते श्रद्धाज्योत प्रज्वलित करण्यात आली. याचवेळी व्हाईट आर्मीचे जवान, अवनी, बालकल्याण संकुल, चेतना मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी बिंदू चौक परिसरात पणत्या लावून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. नगरसेवक आदिल फरास, पोलीस निरीक्षक मोहिते, प्रतिभा करमरकर यांची भाषणे झाली. या सर्वांनी जीवनमुक्ती संस्थेचा तसेच व्हाईट आर्मीचा कार्यविस्तार आणखी व्हावा, अशी अपेक्षा केली. तसेच सुरू असलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. संस्थेचे प्रमुख अशोक रोकडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सार्थक क्रिएशनचे सागर बगाडे यांनी केले. (प्रतिनिधी)
‘अमर रहे’ घोषणांनी बिंदू चौक दुमदुमला
By admin | Published: December 25, 2014 11:43 PM