कोल्हापूर : गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे जमीनदोस्त असलेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यात बऱ्यापैकी सावरला होता. पक्षी आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघत असतानाच, आता बर्ड फ्लूने मोठे संकट उभे केले आहे. ग्राहक अपप्रचाराला बळी पडले, तर कष्टाने सावरलेला हा व्यवसाय पुन्हा एकदा मोडून पडेल, या भीतीने पोल्ट्रीधारक हबकले आहेत.
कोणताही फ्लू आला तर त्याचा पहिला बळी पोल्ट्री व्यवसायच ठरतो, असे समीकरणच गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. मार्चमध्ये आलेल्या कोरोनावेळी देखील चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, असा अपप्रचार झाला आणि पोल्ट्री व्यावसायिकांना जिवंत कोंबड्या गाडून टाकाव्या लागल्या, मोफत वाटाव्या लागल्या. कोरोनाने या व्यवसायाला पूर्वार्धाच्या टप्प्यात जमीनदोस्त केले तरी, उत्तरार्धात मात्र चिकन आणि अंडी खाऊनच कोरोनाशी लढता येते, असा प्रचार झाल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा स्थिरस्थावर होऊ लागला.
२०१७-१८ मध्ये राज्यात बर्ड फ्लूने असाच धिंगाणा घातला होता. अख्ख्या पोल्ट्री बंद करून पिली व कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या. या रोगाने हाहाकार उडवला होता. आता पुन्हा एकदा त्याचा प्रसार झाल्याने तीन वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत. दक्षता म्हणून हजारो रुपये खर्चून निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवली जात आहे.
चौकट ०१
काय आहे बर्ड फ्लू
बर्ड फ्लू हा सर्दीसारखा आजार आहे. कोंबड्यांना सर्दी होऊन त्यांचा श्वास गुदमरतो आणि त्या गतप्राण होतात. स्वच्छता आणि लसीकरण हाच त्यावरचा उपाय असतो.
चौकट ०२
मानवी आरोग्यावर परिणाम नाही
या फ्लूचे जंतू १०० डिग्री तापमानात जिवंत राहू शकत नाहीत. चिकन व अंडी हे या तापमानावर शिजवून खाल्ले जात असल्याने त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे याचा बाऊ करण्याची फारशी गरज नाही.
चौकट ०३
आता कोंबडीचा एक किलोचा दर ९० ते ११० रुपये असा आहे. एक किलोसाठी ६५ ते ७० रुपये खर्च येतो. कोंबडीची ४० दिवसात तर अंड्यांची उचल १५ दिवसात झाली, तरच फायदा होतो. अंडी शेकडा ४५० रुपये होलसेल, तर ६०० रुपये रिटेल असा दर आहे.
चौकट ०४
जिल्ह्यात ४५०० पोल्ट्री आहेत. एकेका पोल्ट्रीसाठी किमान पाच लाखाची गुंतवणूक झालेली असते.
चौकट ०५
कोरोनावेळी झालेल्या अपप्रचारामुळे झालेल्या नुकसानीतून अद्याप आम्ही सावरलेलो नाही. कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन व्यवसाय म्हणून सुरू करत असताना आता बर्ड फ्लूमुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी औषधाचा अतिरिक्त खर्चाचा बोजा सोसण्याची तयारी करावी लागत आहे.
- विनायक क्षीरसागर, पोल्ट्री व्यावसायिक