अनिल पाटीलमुरगूड: वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर बिरदेव सिध्दाप्पा डोणे (रा. यमगे ता. कागल. जि. कोल्हापूर) या मेंढपाळाच्या मुलाने ते पुर्ण केले. बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव याने देशात ५५१ वी रँक मिळवली आहे. निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई वडील यांच्यासह बेळगाव परिसरात बकरी चारण्यामध्ये व्यस्त होता. आज तो यमगे मध्ये येणार आहे.घर जागा नसल्याने शाळेचा व्हरांडा करायचा अभ्यासबिरदेवचं बालपण डोंगरदर्यांमध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले. काही तरी मोठं करायचं, स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं असे स्वप्न त्याने उराशी बाळगले. गावातील शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा व्हरांडा तो अभ्यासामध्ये व्यस्त असायचा. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय.पी.एस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते. बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत ८९ टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता. त्यानंतर त्याने पुणे सी.ओ.इ .पी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेचे वेड, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यशसुरवाती पासून स्पर्धा परीक्षेचे वेड असल्याने त्याने सुरवातीस दोन वर्षे दिल्ली मध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC ) परीक्षेची तयारी करू लागला त्यानंतर तो परत पुणे येथे आला तिथे सदाशिव पेठे मध्ये अभ्यास करू लागला.त्याने आता पर्यंत दोन वेळा ही परीक्षा दिली होती पण त्याला यशाने हुलकावणी दिली होती. पण जिद्दीने त्याने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि यामध्ये उज्वल यश मिळवत त्याने देशात ५५१ वी रँक मिळवली. कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस अधिकारीबिरदेव आपल्या आई वडीलासह बुधवारी गावी परतणार आहे. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन ग्रामस्थ करत आहेत. कागल तालुक्यातील पहिला आय पी एस अधिकारी होण्याचा बहुमान बिरदेव ने मिळवला आहे. सोशल मीडियावर कागलचा अभिमान बिरदेव अशा पोस्ट व्हायरल होत आहेत.
कोल्हापुरातील यमगे येथील मेंढपाळाच्या पोराचे UPSC परीक्षेत लख्ख यश!, बिरदेव डोणे याने मिळवली ५५१ वी रँक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 19:00 IST