या जयंतीदिनी शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता आझाद चौक येथील दत्तभिक्षालिंग मंदिराशेजारील श्री देवी इंदुमती बोर्डिंगच्या नव्या इमारतीचा अर्पण सोहळा शाहू छत्रपती यांच्या हस्ते, तर पालकमंत्री सतेज पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्या सरोज (माई) पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बहुजन समाज पार्टीच्यावतीने दुपारी बारा वाजता दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंग येथे जयंती सोहळा साजरा होणार आहे. त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजणे मार्गदर्शन करणार आहेत. लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे सायंकाळी पाच वाजता बिंदू चौक येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. कोल्हापुरातील सार्थक आर्ट, सोशल अँड क्लचरल फाउंडेशनने ‘राजर्षी शाहू गाथा’ या ४५ मिनिटांच्या लघुनाट्याची निर्मिती केली आहे. त्याचे सादरीकरण जयंतीदिनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या यू-ट्युब, फेसबुकपेजद्वारे केले जाणार आहे. श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने वर्षभर ऑनलाईन व्याख्यानमालेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या व्याख्यानाने होणार आहे.
विविध उपक्रमांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:17 AM