कणकवली : पोटच्या तीन मुलांना वाऱ्यावर सोडून आई-वडील पळून गेल्याचा प्रकार कणकवलीत झाला आहे. मोठा मुलगा चार दिवसांपूर्वी ओरोस येथे रेल्वेट्रॅकवर फिरताना आढळला, तर लहान भाऊ-बहिणीला आई सोमवारी पहाटे भालचंद्र आश्रमात सोडून निघून गेली. याप्रकरणी मुलांच्या मामाने पोलिसांत जबाब नोंदविला आहे. याबाबत वृत्त असे की, मालवण तालुक्यातील एका गावातील बाळकृष्ण आणि मनीषा या दोघांचा पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. त्यावेळी त्यांना गावातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तीन मुले झाली. अलीकडे पती-पत्नी तीन मुलांसह कणकवलीत राहत होते. बाळकृष्ण हा गवंडी काम करतो. त्याला मद्यपानाचे व्यसन आहे. मोठा मुलगा युवराज हा सातवीत शिकतो. धाकटी मुलगी संतोषी पाचवीत, तर लहान मुलगा ऋग्वेद दुसरीत येथील तीन नंबर शाळेत शिकत आहे. दरम्यान, २५ नोव्हेंबरला मोठा मुलगा युवराज हा ओरोस येथे रेल्वेट्रॅकवर फिरताना आढळला. त्याला काहींनी ओरोस पोलीस ठाण्यात नेऊन सोडले. त्याने माहिती दिल्यानुसार पोलिसांनी त्याला कणकवलीतील चुलत मामाकडे आणून सोडले. या मामाने आई-वडिलांचा शोध लागला नसल्याने त्याला ओरोस येथील बालसुधारगृहात दाखल केले. त्यातच रविवारी पहाटे ४.३० वाजता या मुलांच्या आईने लहान दोघांना भालचंद्र महाराज आश्रमात सोडले. त्यांच्याकडे कपड्यांची पिशवी दिली आणि ती निघून गेली. सकाळी परिसरातील नागरिकांनी चौकशी केली असता त्यांनी कणकवलीत राहणाऱ्या आपल्या चुलत मामाचे नाव सांगितले. तेव्हा त्याने दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. मुलांच्या सख्या मामाला बोलवून घेण्यात आले. त्याने याप्रकरणी जबाब नोंदवत आपण त्यांचा सांभाळ करण्यास असमर्थ असून, बालसुधारगृहात पाठवावे, असे पोलिसांना लिहून दिले. मुलांचे आई-वडील असे अचानक का सोडून गेले, याबद्दल नेमके कारण कळलेले नाही. (प्रतिनिध्सख्ख्या मामाला ओळखले नाहीकणकवलीत राहणाऱ्या चुलत मामाची मुलांशी ओळख होती, तर गेल्या पंधरा वर्षांत मुलांनी आणि मामाने एकमेकांना ओळखले नाही. गेले आठ दिवस मुलांनी आपण कसाल येथे गोसावी यांच्याकडे राहत होतो, अशी माहिती पोलिसांना दिली.
जन्मदात्यांनी मुलांना सोडले वाऱ्यावर
By admin | Published: November 30, 2015 11:41 PM