आजी आजी तुला आठवतो का गं तुझा वाढदिवस? सात-आठ वर्षांचा एक मुलगा आपल्या आजीला विचारत होता. ‘नाही रे बाळा आम्हाला तर कायबी आठवत नाय. चार दिवसांवर दिवाळी होती म्हणं तवा माझा जलम झाला. असं माझी आय मला सांगायची.’ मुलांना कपडे घेण्यासाठी म्हणून कोल्हापुरातील एका कापड दुकानात गेलो असताना हा सवाल कानी पडला अन् माझे कान टवकारले. मुलाचे आई-वडील त्याच्यासाठी कपडे खरेदी करीत होते. कपडे पाहून झाल्यावर मुलगा आपल्या आजीला हा प्रश्न विचारत होता. एक खेडूत वृद्धेचे हे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यासमोरून त्यांच्या काळातील परिस्थिती कशी असेल याविषयीच चित्र तरळून गेले.
कारण माझी आजीच काय आई, वडिलांनाही त्यांची नेमकी जन्मतारीख माहीत नाही. आठवत नाही. कारण ते दोघेही निरक्षरच. सध्या मात्र वाढदिवस दणक्यात साजरे केले जातात. मोठ्या माणसांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. आयुष्यातले एक वर्ष कमी होत असले तरी त्याचा आनंद साजरा केला जात असतो. वाढदिवस कसा साजरा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण तो वैयक्तिक विषय आहे. कारण आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांना यानिमित्ताने एकत्र येण्याची संधी मिळत असते. एक सोहळा साजरा होत असतो. काहीजण आपल्या आवडत्या पाळीव प्राण्यांचेही वाढदिवस साजरे करीत असतात. आता झाडांचेही वाढदिवस साजरे होऊ लागले आहेत.
वृक्षसंपदा कमी होऊन पर्यावरणीय समतोल ढासळत असताना झाडांच्या बाबतीत होऊ लागलेली ही जागृती खूपच महत्त्वाची आणि समाजाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने दिलासादायक आहे. मी सांगतोय ते कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या पूर्व भागात असणाºया राज कपूर पुतळा उद्यानात बालवृक्षांच्या वाढदिवस समारंभाबाबत. या उद्यानातील सुमारे शंभर बालवृक्षांचा वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा झाला. या उद्यानात फिरायला येणाºया नागरिकांनीच तो साजरा केला. या नागरिकांचे वेगवेगळे ग्रुप आहेत. ते यानिमित्ताने एकत्र आले. विशेष म्हणजे ही झाडे लावण्यात आणि त्यांना वाढविण्यात त्यांचाच पुढाकार आहे. या झाडांसाठी त्यांनी एक दत्तक योजनाही राबविली आहे. अनेकांनी तेथील झाडे दत्तक घेतली आहेत. अगदी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांचाही त्यामध्ये समावेश आहे. या वाढदिवसानिमित्त त्या झाडांना विधिवत अभिषेक घालण्यात आला. त्यांची पूजा करण्यात आली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी..’ची आठवण करून देणारी आणि ती वाढविण्यासाठी इतरांनाही पे्ररित करणारी ही घटना आहे. तसे वृक्षलागवडीसाठी शासनासह वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न होतच असतात. मात्र, केल्या जाणाºया लागवडीपेक्षा होणारी वृक्षतोड जादा असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्याचा परिणाम पाऊस अनियमित होण्यावर झाला आहे. हवा प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड यामुळेच ग्लोबल वॉर्मिंगसारखा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आपल्याकडचे तीन ऋ तू; पण तेही अनियमित झाले आहेत. कधी कधी तिन्ही ऋतू एकाच दिवशी अनुभवायला मिळणारे दिवसही दिसू लागले आहेत.
हे सर्व थांबविण्यासाठी निसर्गाचा आणि पर्यावरणाचा समतोल पुन्हा साधणे आवश्यक आहे. वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन याबाबत शासकीय, संस्थात्मक पातळीवर सतत प्रयत्न होत असतातच. कोल्हापूर जिल्ह्यात १७४२ चौरस किलोमीटर क्षेत्रात जंगल आहे. सह्याद्रीच्या वरदहस्तामुळे आणि जंगलांमुळेच या जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा फारशा बसत नाहीत. पण, पाऊसच नाही झाला तर काय होऊ शकते याची झलक गेल्यावर्षी जिल्ह्याने पाहिली आहे. त्यामुळेच ‘झाडे लावा, झाडे जगवा’सारखे उपक्रम नागरिकांनीच स्वत:च्या खांद्यावर घेण्याची गरज आहे. माणसांप्रमाणेच बालवृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याची घटना हे त्यादृष्टीने सकारात्मक आणि अनुकरणीय पाऊल आहे.- चंद्रकांत कित्तुरे