कोल्हापूर/पेठवडगाव : पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाक्यावर पोलिसांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या राजस्थानमधील ००७ या बिष्णोई गँगला संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाईसाठी मंगळवारी पुणे न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत त्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस ठाण्यासमोर वाळूच्या पोत्यांचा मनोरा तयार करून याठिकाणी चोवीस तास बंदूकधारी कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
म्होरक्या शामलाल गोवर्धनराम पुनिया ऊर्फ बिष्णोई (वय २४, रा. भोजासर, जि. जोधपूर) याच्यासह श्रवणकुमार मनोहरलाल मांजू ऊर्फ बिष्णोई (२४, रा. विष्णूनगर, बारखी, ता. आसिया, जि. जोधपूर), श्रीराम पांचाराम बिष्णोई (२३, रा. बेटलाईन, जोधपूर) यांचा यामध्ये समावेश आहे. या गँगवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, सामूहिक अत्याचार, दरोडा यासारखे ४८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गँगकडून पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे व कार जप्त केली आहे.
राजस्थानातील गँगवर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गैरलाभ, वर्चस्व प्रस्थापित करणे, हिंसाचाराचा वापर करणे, अत्याचार, जबरदस्ती करून अवैध मार्गांनी दरोडा, सरकारी नोकरदारांवर फौजदारीपात्र हल्ला करणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, अग्निशस्त्रे बाळगणे, गर्दी, मारामारी असे सुमारे २८ गुन्हे दाखल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. पुणे मोक्का न्यायालयाने या गँगला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बिष्णोई गँगच्या विरोधात संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाईच्या तपासाला सुरुवात झाली आहे. अभ्यासपूर्वक तपास करून दोषारोपपत्र लवकरच पुणे मोक्का न्यायालयात सादर केले जाईलडॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक